मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट

राणे कुटुंबीयांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. 

deepak kesarkar narayan rane

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपुर्व घटना आपण पाहिल्या. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचा जन्म झाला. एकमेकांविरोधात उभे ठाकलेले तिन्ही पक्ष एकत्र आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही युतीबाबत चर्चा सुरू होत्या अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. तसेच, ही युती न होण्याचं कारण त्यांनी राणे कुटुंबीयांवर (Narayan Rane Family) ठेवलं आहे. राणे कुटुंबीयांनी सुशांत सिंग आत्महत्या (Sushant Singh Suicide Case) प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) बदनामी केल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेला तर धनुष्यबाणही कामाला येणार नाही, दीपक केसरकरांनी सुनावले

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. या बदनामीत नारायण राणेंचा वाटा होता. ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करतात तेसुद्धा यामुळे दुखावले गेले. भाजपसोबतच्या अनेक लोकांसबोत चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना आम्ही राणेंबाबत विचारलं होतं. तेव्हा भाजपच्या नेत्यांनीही राणेंबाबत विरोध दर्शवला होता. ज्या व्यक्तीला मोठं राजकीय भवितव्य आहे, अशा घरातील तरुणाची बदनामी होते, तेव्हा साहजिकच राग येतो. त्यामुळे हे प्रकरण आम्ही केंद्रात नेलं. माझ्यासारखा लहान नेता पीएमओ कार्यालयात पोहोचला. यासंदर्भात मी मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कानावर ही माहिती सांगितली. त्यांनी ही माहिती ऐकली. त्यांनी व्यवस्थित रिस्पॉन्ड केलं, असं दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा – ठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, दीपक केसरकरांकडून पुनरुच्चार

सुशांत प्रकरण घडलं तेव्हा नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात प्रेस घेतली. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यामुळे मी पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचलो. या काळात मोदीं- ठाकरेंचा संवाद सुरू झाला. ही दोन्ही महान माणसं आहेत. त्यांच्यात काहीही चुकू नये म्हणून आम्ही काळजी घेतली. संवादानंतर त्यांच्यात भेटही घडून आली. त्यांच्या येणाऱ्या निरोपावरून मोदींचं ठाकरे कुटुंबियांवर असलेलं प्रेम दिसत होतं. कुटुंबप्रमुख कसा असावा हे मोदींनी दाखवून दिलं. याच वेळी मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपायचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – राज्यात शिवसेनेची ओळख एकनाथ शिंदेनी निर्माण केली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

या भेटीनंतर येत्या १५ दिवसांत उद्धव ठाकरे आपल्या पदाचा त्याग करणार होते. याची पूर्वसुचना ते कार्यकर्त्यांना देणार होते. त्यांच्या मनात जे काही आहे ते करण्याची ठाकरेंनी दर्शवली. पण या गोष्टीत खूप वेळ गेला. याच काळात महाविकास आघाडीने भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं. एकीकडून युतीची चर्चा सुरू असताना १२ आमदारांचं निलंबन झाल्याने दुसरीकडे भाजप नाराज झाले होते. त्याच काळात नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेही नाराज झाले. त्यानंतर युतीची चर्चा थांबली. ही मोहीम थांबवण्यात आली, असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन! राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

याच काळात आपण भाजपसोबत राहुया असं शिवसेनेतील अनेक नेते सांगत होते. युतीची बोलणी पुन्हा सुरू व्हावी अशी ठाकरेंची इच्छा होती. पण बोलणी पुढे होऊ शकली नाहीत. एकनाथ शिंदे शिवसेनेतील दुसऱ्या क्रमाकांचे नेते होते. त्यांनी ठाकरेंची भेट घेऊन मूळ विचारधारेसोबत राहत भाजपसोबत राहण्याची मागणी करत होते. अनिल देसाई, मिलंद नार्वेकर, यांनाही याबाबत कल्पना दिली होती.

दरम्यान, युतीची चर्चा करण्यासाठी ज्या आमदारांनी पुढाकार घेतला त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा एका कुटुंबादतील वाद आहे. शिवसेना संपवण्याचा कोणताही घाट नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.