सुप्रिया सुळेंबद्दलचं वक्तव्य चुकीचं, दीपक केसरकरांचा सत्तारांना घरचा आहेर

deepak Kesarkar

मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंबद्दलचं वक्तव्य चुकीचं, असं म्हणत शिंदे गटाचे नेते प्रवक्ते आणि मंत्री  दीपक केसरकरांनी अब्दुल सत्तारांना घरचा आहेर दिला आहे.

दीपक केसरकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंबद्दल झालेलं वक्तव्य चुकीचं आहे. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पवार कुटुंबियांबद्दल महाराष्ट्राला नेहमीच आदर राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत व्यक्तिगत बोलणे आणि त्यांनी ते बोलल्यानंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. लवकरच आमची एक बैठक देखील होणार आहे. त्या बैठकीत सर्वच प्रवक्त्यांना बोलावण्यात आलं आहे. आपण बोलताना कशी काळजी घ्यावी, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेश देणार आहेत. ते फक्त मुख्यमंत्री नसून आमचे मुख्यनेता सुद्धा आहेत. त्यामुळे सर्व मंत्रीनेत्यांना ते आवश्यक असं मार्गदर्शन करतील, असं दीपक केसरकर म्हणाले.

तुमच्या तोंडून काहीतरी चुकीचं निघावं यासाठी इन्स्टीगेट करण्याची मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आपली लोकं शिवसेनेत पाठवली आहेत. ते महाराष्ट्रभर फिरतायत. त्यांची पूर्वीची वक्तव्यं बघा. अशा लोकांनी शिवसेनेच्या स्टेजवर येणं हा शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा अपमान आहे. राज्यात इन्स्टीगेट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. माझ्या सर्व आमदारांना विनंती आहे की, आता शांत राहण्याची ही वेळ आहे. आपल्याकडून वाईट काहीतरी निघतं का आणि हे निघाल्यानंतर यावर इश्यू करायचा. त्यामुळे हे एक षडयंत्र आहे. या षडयंत्रापासून सावध रहा, मी जे बोलतोय त्याचा सुप्रिया सुळेंच्या झालेल्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही, असंही केसरकर म्हणाले.


हेही वाचा : ‘हे’ घटनाबाह्य कृषिमंत्री, काय नाव त्यांचं?; आदित्य ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल