Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश देवी-देवताच मंदिरांच्या जागेचे कायदेशीर मालक

देवी-देवताच मंदिरांच्या जागेचे कायदेशीर मालक

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, देवस्थानांच्या मिळकतींमधील गैरप्रकार टळणार

Related Story

- Advertisement -

मंदिराचे पूजारी त्या जमिनीचे मालक मानले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे देवी-देवताच मंदिराशी संबंधित जागांचे मालक आहेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि ए.एस. बोपन्ना यांनी दिला. पूजारी केवळ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित व्यवस्थापनाच्या उद्देशाने त्या जागांशी संबंधित काम करू शकतात. त्यामुळे यापुढे मालकी हक्क दर्शवणाऱ्या रकान्यात (कॉलम) केवळ देवतांचंच नाव लिहिलं जावं.

देवी-देवता हे ज्या जागेचे मालक असतात. त्या जागेचे काम देवतांच्या वतीने सेवक किंवा समन्वयक करत असतात. त्यामुळे पूजारी, समन्वयक अथवा संबंधित व्यक्तीच्या नावाचा उल्लेख मालकी हक्काच्या रकान्यात करण्याची गरज नाही, असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देवस्थानांच्या मिळकतींवरील खासगी नावं कमी होतील. देवस्थानांच्या मिळकतीचा मालक हा पुजारी किंवा अन्य कुणीही होऊ शकत नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. देवस्थानची मिळकत ही व्यवस्था आणि त्यासाठीच्या खर्चासाठी असते. त्यामुळे पुजारी अथवा अन्य कुणीही त्या मिळकतीचा मालक होऊ शकत नाही.

- Advertisement -

देवस्थानाची व्यवस्था ठेवण्यास पुजारी अपयशी ठरल्यास त्याला काढून टाकण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केला आहे. त्यामुळेच पुजारी किंवा देवस्थानांवर अधिकार दाखवणारी कुणीही व्यक्ती मंदिराचा मालक होऊ शकत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे देवी-देवतांच्या मालमत्तांवर सांगितला जाणारा बेकायदा अधिकार संपुष्टात येईल. वास्तविक देवाची मिळकत ही देवाचीच असते. मात्र, गेल्या काही दिवसांत मिळकतीच्या कागदपत्रांवर नावं नोंदवून गैरप्रकार सुरू होते. याबाबतच्या तक्रारी न्यायालयात केल्या जात होत्या. मिळकत गिळंकृत करण्याच्या प्रकाराला चाप बसेल. विशेषतः पूजारी आणि अन्य व्यक्तींकडून केले जाणारे गैरप्रकार यामुळे टळतील. हा निर्णय देवस्थानांच्या हिताचा आहे. देवस्थानांच्या मिळकतींना कायदेशीर संरक्षण मिळेल.
– अॅड. भाऊसाहेब गंभीरे, विश्वस्त, कायदा सल्लागार, नाशिक

- Advertisement -