अकोला : परीक्षांमध्ये बोगस विद्यार्थी बसल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. मात्र आता खेळामध्येही बोगस विद्यार्थ्यांचा भरणा होताना दिसत आहे. अकोल्यात बुधवारपासून (27 नोव्हेंबर) 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र या स्पर्धेत अनेक संघांनी 19 वर्षांवरील बोगस खेळाडूंचा सहभाग असल्याचा आरोप प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. (Demand for inquiry as bogus players are playing in state-level school kabaddi tournament for jobs)
अकोला शहरातील वसंत देसाई शासकीय क्रीडा संकुलात 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो संघांनी आपला सहभाग नोंदवला असून यातून एका संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या नावावर जास्त वय असलेल्या खेळाडूंना घुसवल्याचा गंभीर आरोप होताना दिसत आहे. राज्यातील काही व्यावसायिक खेळाडूंचा शाळांमध्ये कागदोपत्री प्रवेश दाखवून त्यांना स्पर्धेत घुसवण्यात आल्याचा आरोप कबड्डी प्रशिक्षक गुड्डू देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला काही खेळाडूंनी देखील दुजोरा दिला आहे.
हेही वाचा – PM Modi Death Threat : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; सहा वर्षात धमकीचा चौथा फोन
गुड्डू देशमुख यांनी सांगितले की, यवतमाळ येथील दुर्गेश मेंढे याचे वय जास्त असतानाही त्याचा 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार गंभीर असून चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी गुड्डू देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात पुराव्यांसह तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन क्रीडा विभागाकडून देण्यात आले आहे. तसेच डॉ. सतीशचंद्र भट आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
नोकऱ्यांसाठी बोगस खेळाडूंचा भरणा
दरम्यान, कबड्डीच्या एका संघात 12 खेळाडूंची निवड होत असते. राज्यस्तरीत स्पर्धेत विजयी झाल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळते. त्यामुळे क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आता 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेतही आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप होताना दिसत आहे.
हेही वाचा – Dacoity : दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक; तिघे पसार तर आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त