आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याची मागणी; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार निर्णय

आदित्य ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडे शिवसेना नेतेपदानंतर आता थेट कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे

aditya thackeray

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळू लागल्याने शिवसेनेचे भावी नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कार्याध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षातूनच होत आहे.

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेचे प्रमुखपद सोपविण्याची मागणी युवासेनेतूनच केली जाऊ लागली आहे. तथापि शिवसेना नेतृत्वाने अजून ती वेळ आली नसल्याचे पक्षातील नेत्यांकडे स्पष्ट केल्याचे कळते. शिवसेनेतील या मागणीवर उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच शिवसैनिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांच्या या दौऱ्याला शिवसैनिकांकडून प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडे शिवसेना नेतेपदानंतर आता थेट कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे.

मात्र त्याचवेळी पक्षाला पुन्हा उभारी मिळावी, पक्षातील तरूण सैनिकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करता यावे यासाठी तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेची जवाबदारी सोपविण्याची मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. युवासेना ही शिवसेनेची यंग ब्रिगेड आहे. राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासारखी नेतृत्व युवा संघटनेतून तयार झाले आहेत. त्यामुळे तेजस ठाकरेंनाही राजकारणात जम बसवण्याआधी व्यासपीठ म्हणून युवासेनेची धुरा सोपवण्याची मागणी होऊ लागली आहे.

तेजस ठाकरे यांच्याभोवती ‘ब्रँड ठाकरे’चे वलय असल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आधीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळे आता शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरे सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते असे मत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नव्हते.

काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र आता शिवसेनेत कधी नव्हे अशी अभूतपूर्व फूट पडल्याने पक्ष काहीसा अडचणीत आला आहे. अशावेळी तेजस ठाकरे यांच्या पक्षातील प्रवेशाने शिवसेनेला नवे बळ मिळेल असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तेजस ठाकरे यांनी अलीकडेच कोल्हापूर दौऱ्यानंतर कार्ला गडावर जात आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली होती.


हेही वाचाः ‘रडायचं नाही लढायचं’, संजय राऊत यांचे विरोधी पक्षांना पत्र