तुरुंगात माझा खूप छळ झाला, संसदीय समितीसमोर मुद्दा उपस्थित करणार; संजय राऊतांची माहिती

ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात माझा खूप छळ झाला. यामुळे मागील काही वर्षांत ईडी( ED), सीबीआय (CBI) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत विरोधकांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या.

दरम्यान संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत 100 दिवस ईडी कोठडीत होते. ज्यानंतर 9 नोव्हेंबरला पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन दिला, या जामीन आदेशात कोर्टाने ईडीच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, मागील काही वर्षात देशातील केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय हेतूने अटक सत्र सुरु केले आहे. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या या कारवाईची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. या पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. देश राज्यघटनेच्या चौकटीत चालते. संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे, सध्या संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात माझा छळ झाला, मी लवकरच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, त्यांना माझा तुरुंगातील अनुभव आणि माझ्या कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात आली याची माहिती देणार असल्याचेही राऊत म्हणाले.


हेही वाचा l फेसबुकवरील जाहिरातीला भुलली महिला अन् लागला १२ लाखांना चुना