Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र महारॅलीद्वारे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे शक्तिप्रदर्शन

महारॅलीद्वारे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे शक्तिप्रदर्शन

Subscribe

नाशिक : एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी मंगळवार (दि. 14 मार्च) पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी जिल्हा परिषद संघटनांकडून महारॅली काढुन शासनाच्या धोरणाच निषेध करण्यात आला. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून 25 हजार शासकीय कर्मचारी या महारॅलीत सामील झाले.

जि.प. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामध्ये जि.प.कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, कर्मचारी युनियनचे विजयकुमार हळदे, लिपीक वर्गीय संघटनेचे प्रमोद निरगुडे, परिचर संघटनेचे विजय शिंदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक चे मधुकर आढाव, पशुसंवर्धनचे भगवान पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पिंगळे, कर्मचारी बँक उपाध्यक्षा मंदाकिनी पवार, कर्मचारी बँकेचे संचालक अजित आव्हाड, आरोग्य कर्मचारी विजय सोपे, औषध निर्माण संघटनेचे विजय दराडे, लेखा कर्मचारी संघटनेचे दिनकर सांगळे, लिपीक हक्क संघटनेचे निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या महारॅलीत राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र मार्फत राज्य सरकारी जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सामील झाले.

- Advertisement -

सकाळी 10 वाजेपासून हुतात्मा अनंता कान्हेरे मैदानावर राज्य कर्मचारी जमायला सुरुवात झाली. संपूर्ण जिल्ह्यातील राज्य कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले. बॅनर, टोप्या, घोषणांचे शर्टस् यावर अधोरेखीत स्लोगनद्वारे कर्मचार्‍यांनी मागण्या नोंदविल्या. पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन-जुनी पेन्शन, कर्मचारी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी मैदान दणाणून गेले. सुमारे 25 हजार कर्मचार्‍यांनी महारॅलीत भाग घेतला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात रॅलीने जिल्हा परिषदेच्या दिशेने कुच केले. जिल्हा परिषद, गंजमाळ, शालीमार मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याजवळ महारॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद संघटनांच्या पदाधिकार्‍यांची यथोचित भाषणे झाली. भाषणादरम्यान शासनाकडे जुन्या पेन्शनची मागणी करण्यात आली.

कर्मचार्‍यांच्या रॅलीदरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गंजमाळ, शालीमार, शिवाजीरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर ताण आला. संपूर्ण रॅली मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मात्र दक्ष नाशिक वाहतुक पोलिसांनी रॅली मार्गावरील प्रत्येक चौकात वाहनांना थांबवित रॅलीला मार्ग मोकळा करुन दिला.

काय आहेत मागण्या?
- Advertisement -

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदने, चर्चेच्या माध्यमातून मागण्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जुनी पेन्शन योजना लागु करा, सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसित करा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या यासह इतर मागण्या करण्यात आल्या. मात्र या मागण्यांना शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. शेवटी नाईलाजास्तव राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.

- Advertisment -