कर्जतमध्ये आढळला डेंग्यूचा रुग्ण !

पालिका सतर्क, फवारणीला सुरूवात

dengue-mosquito.jpg.860x0_q70_crop-scale
डेंग्यूचा डास

पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्जत शहराच्या गुरुनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर पालिका सतर्क झाली असून विशेष फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहरात 50 पेक्षा मागे पडलेल्या कर्जत शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. शहराच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिलेला असतो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना कचर्‍याचे ढिगाचे व्हिडिओ दाखवले होते. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढत आहे. डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने पालिकेचे स्वच्छतेचे दावे फोल ठरले आहेत. त्यात गुरुनगरसारख्या चांगल्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
पालिकेला त्या डेंग्यूसदृश्य रुग्णाची माहिती मिळताच कर्जत उप जिल्हा रुग्णालयाने मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांना कळविले. त्यानंतर नगराध्यक्ष जोशी आणि इतरांनी गुरुनगर भागात जाऊन तेथे असलेल्या सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारांची पाहणी केली. त्यानुसार रुग्ण ज्या भागातील आहे तेथील एक भिंत गटारावर कोसळली असल्याने सांडपाणी वाहून नेणारे गटार बंद झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी अस्ताव्यस्त पसरले आहे.

ही स्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी तत्काळ पालिकेच्या पथकाला पाचारण करून त्यांच्याकडून सांडपाणी वाहून नेणारे गटार मोकळे करून घेतले आहे. त्यानंतर आता शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. त्यात डेंग्यूसदृश्य रुग्णावर कर्जतच्या बाहेर उपचार सुरू असल्याने त्याचा संसर्ग होणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.

शहरात गटारे कुठेही तुंबून राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. सर्व भागात फवारणी केली जाणार आहे. ते काम निश्चित काळात पूर्ण करून पावसाळ्यात साथीचे आजार बळावू नयेत यासाठी आम्ही फवारणी करण्याचे काम कायम सुरू ठेवणार आहोत.
-सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, नेरळ