घरमहाराष्ट्रमहाडमधील लेण्या ठरत आहेत अनास्थेच्या बळी

महाडमधील लेण्या ठरत आहेत अनास्थेच्या बळी

Subscribe

कोल, गांधारपाले वारसा जपलेल्या

महाड जवळील कोल आणि गांधारपाले लेण्या सरकारी अनास्थेच्या बळी ठरत आहेत. गेली अनेक वर्षात या लेण्यांवर काडीमात्र खर्च करण्यात आलेला नाही. ज्या पुरात्तव विभागाच्या ताब्यात या लेण्या आहेत त्या पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षामुळे महाडमधील हा बौद्ध वारसा काळाच्या पडद्याआड जात आहे. एकीकडे रायगड प्राधिकरण स्थापन करून जिल्ह्याच्या विकासासाठी लाखो रुपये निधी खर्चीला जात असताना दुसरीकडे या लेण्या मात्र दुर्लक्षित झाल्या आहेत.

महाडमध्ये विष्णुपुलीत हा बौद्ध राजा राज्य करीत होता. त्याकाळात गांधारपाले आणि कोल या दोन गावांमध्ये या लेण्या इ.सन दुसर्‍या शतकामध्ये खोदल्या गेल्या असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कोल लेण्या दोन समुहात विभागल्या गेल्या आहेत. महाडपासून जवळपास तिन किमी अंतरावर या लेण्या आहेत. यात पहिल्या समुहात ५ तर दुसर्‍या समुहात दोन लेण्या खोदलेल्या आहेत. पहिल्या लेणीमध्ये सभागृह, तिसर्‍या लेणीमध्ये दोन समान खोल्या, चौकोनी प्रवेशद्वार पहावयास मिळतो. याठिकाणी दोन शिलालेख ही आढळतात. या शिलालेखांमध्ये सन किंवा राजांचा उल्लेख नसला तरी बौद्ध धम्माचा प्रसार तसेच व्यापारी केंद्र म्हणून या लेण्यांचा वापर होत असल्याचे दिसते. महाड तालुक्याला बौद्ध धर्माचा इतिहास असल्याचा हा भक्कम पुरावा आहे.

- Advertisement -

अशाच प्रकारची दुसरी लेणी गांधारपाले गावाजवळ आहे. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या या लेण्या महामार्गवरुन स्पष्ट दिसत असल्याने आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायर्‍या असल्याने त्या स्पष्ट दिसतात. याठिकाणी एकूण २६ लेण्यांपैकी दोन मोठे सभागृहही दृष्टीक्षेपात पडतात. अनायसेच नगरेज पडत असल्याने महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक या लेण्या आवर्जून पाहण्यास थांबतात. मात्र या लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी कुठलीही व्यवस्था पुरातत्व विभागाकडून करण्यात आली नाही. या लेण्यांकडे प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने काळाच्या ओघात या लेण्यांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. कोल लेण्यांच्या एका समुहातील केवळ एकच लेणी शाबुत आहे.

दुसर्‍या लेण्यांमध्ये माती साचल्याने याठिकाणी लेण्या आहेत हे ही लक्षात येत नाही. गांधारपाले लेण्यांवर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायर्‍यांची देखील दुरावस्था झाली आहे. लेण्या चढून वर गेल्यावर पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा नाही. लेण्यांमध्ये असलेले जलकुंडदेखील स्वच्छ केले जात नाहीत. ऐन रात्रीच्या वेळेस याठिकाणी विजेची देखील करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात लागणारी शेवाळ आणि उन्हाळ्यात लावले जाणारे वणवे यामुळे या लेण्या धोक्यात आल्या आहेत. लेण्यांचे स्तूप झिजून गेले आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असलेले दोन स्तूप तर बेवारस पडलेले दिसतात.

- Advertisement -

तत्कालीन सरकारने रायगड संवर्धनाकरिता रायगड प्राधिकरण स्थापन करून करोडो रुपयांची तरतूद गड किल्ले संवर्धनासाठी केली आहे. अशाच प्रकारे लेणी संवर्धनासाठी शासनाने पावले उचलून लेण्यांचे संवर्धन केले पाहिजे, जगभरातून संपूर्ण राज्यातील लेण्या पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र गेली काही वर्षात अनेक लेण्यांबाबत वायफळ गैरसमज पसरवत लेण्यांच्या परिसरात अतिक्रमण देखील झाले आहे.

रायगड संवर्धनाचे काम स्तुत्य आहे, परंतु कोकणातील दुर्लक्षित बौध्दकालीन लेण्यांचे संवर्धन करण्याकडेही सरकराने लक्ष पुरवले पाहिजे, अन्यथा पुरातन वारसा लोप पावेल. शासनाने या लेण्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.
-प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्ता महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -