Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिष्यवृत्ती परीक्षेचा अट्टाहास का? जुलैमध्ये परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज

शिष्यवृत्ती परीक्षेचा अट्टाहास का? जुलैमध्ये परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी डेल्टा प्लस व्हेरियंट या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ नको यासाठी पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा घेण्यास सकारात्मक नाहीत.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा घाट पुन्हा घालण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी डेल्टा प्लस व्हेरियंट या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ नको यासाठी मुंबई महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा घेण्यास सकारात्मक नाहीत. मात्र, दुसरीकडे मुंबई महापालिकेचे शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा घेण्याची जय्यत तयारी केली आहे. यामुळे पाचवी आणि आठवीचे पालक आणि शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला होता. त्यापूर्वी २१ मार्चला होणारी ही परीक्षा एमपीएससीच्या परीक्षेमुळे २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील प्रस्ताव परिषदेकडून तयार केला आहे. हा प्रस्ताव परीक्षा परिषदेच्या समितीची ३० जूनला होणार्‍या बैठकीमध्ये सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव परवानगीसाठी शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठवण्यात येणार आहे. त्याला परवानगी मिळाल्यानंतर जुलैमध्ये परीक्षा घेण्याची तयारी परिषदेने केली आहे.

- Advertisement -

त्यानुसार परिषदेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना गोपनीय साहित्य पोहोचवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे. तसे पत्रकही परिषदेकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकार्‍यांना पाठवण्यात आले आहे. परिषदेच्या पत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही पालिकेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी सध्या डेल्टा प्लस व्हेरियंट या नव्या विषाणूचे रुग्ण सापडत असून, लवकरच तिसरी लाटही येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर शिष्यवृत्तीची परीक्षा घेऊन परिषदेकडून राज्यातील तब्बल ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचा आरोप पालक व शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

दहावी, बारावी, नीट, जेईई, सीए यासारख्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास राज्य परीक्षा परिषदेकडून का करण्यात येत आहे. तसेच मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका कायम असल्याने मुंबई महापालिकेचे शिक्षण विभागही परीक्षेची तयारी करत असल्याने पालक व शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

परीक्षा घेण्यासंदर्भातील आम्ही तयार केलेला प्रस्ताव शिक्षण सचिवांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यावर परीक्षेसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. पालक आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेण्याबाबत सातत्याने विचारणा होत असल्याने परीक्षेबाबत विचार करण्यात आला आहे. मात्र, ही परीक्षा ऐच्छिक असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक नाही.
– तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

 

मुंबईमध्ये सध्याच्या घडीला किमान सातशे ते आठशे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. परीक्षा घेऊन लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे मुंबईमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा होणार नाही.
– आशुतोष सलील, सहआयुक्त, मुंबई महापालिका

मुंबईतील शिष्यवृत्तीला नोंदणी केलेले विद्यार्थी

- Advertisement -

जिल्हा              पाचवी      आठवी

मुंबई पालिका     ४६२२      ४२०३
मुंबई दक्षिण       २१८९      १९७२
मुंबई पश्चिम       ३०६७      २३७१
मुंबई उत्तर         ३४२०      २६२८
एकूण             १३२९८     १११७४

- Advertisement -