घरमहाराष्ट्रकोरोना आटोक्यात आणा,नाय तर तुम्ही पुण्यात दिसणार नाहीत!

कोरोना आटोक्यात आणा,नाय तर तुम्ही पुण्यात दिसणार नाहीत!

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काम न करणार्‍या अधिकार्‍यांना इशारा

आपल्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील वाढत्या कोरोनाबद्दल गंभीर झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील वाढत्या कोरोनावर नियंत्रण आणण्याचे त्यांनी मनावर घेतले आहे. त्यामुळेच शुक्रवारी पुण्यातील अनेक बड्या सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेऊन अजित पवार यांनी त्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील कोरोना आटोक्यात आला नाहीतर तुमच्यापैकी काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, काम न करणार्‍या अधिकार्‍यांची कुठे बदली करायची हे मला चांगलेच माहित आहे, असा सज्जड दमही अजित पवार यांनी या अधिकार्‍यांना भरला आहे.

मुंबई सारख्या महानगरामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून, अधिकार्‍यांना फ्री हॅन्ड दिल्यानंतर पुण्यात परिस्थिती का सुधारत नाही. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, काम न करणार्‍या अधिकार्‍यांची कुठे बदली करायची हे मला चांगलेच माहिती आहे. असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला.

- Advertisement -

पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, कोरोना आटोक्यात न आल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही. हे अधिकार्‍यांनी लक्षात घ्यावे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासाठी राज्य सरकार आपल्या सदैव पाठीशी आहे. मात्र, अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. मला कामाचा हिशोब द्यावा लागेल या शब्दांमध्ये अधिकार्‍यांना अजित पवार यांनी सुनावले. त्यांना अधिकार्‍यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ते चिडले. यापुढे जर कामात सुधारणा दिसली नाही तर मला मोठी अ‍ॅक्शन घ्यावी लागेल असा सज्जड दमही त्यांनी अधिकार्‍यांना भरला.

पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदारी अजित पवार यांची असल्याने त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावं लागत आहे. पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी विधान भवन या ठिकाणी अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.

- Advertisement -

बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमावबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -