वर्धा : मराठा समाजाने सरसकट आरक्षणाची मागणी केल्यानंतर ओबीसी समाजाकडून या मराठा समाजाच्या या मागणीचा विरोध केला आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाच्या आरक्षणाला याचा धक्का लागू शकतो. त्यामुळे मराठा समाजाने उपोषण मागे घेताच ओबीसी समाजाकडून सरकारला वेठीस धरण्यासाठी उपोषणाचे शस्त्र उगारण्यात आले. ज्यानंतर राज्य सरकारने ओबीसी समाजाची समजूत काढत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास याचा कोणताही तोटा ओबीसी समाजाला होणार नाही, असे आश्वस्त केले. परंतु आता भाजपकडून ओबीसी समाजाकरिता ‘ओबीसी जागर यात्रेचे’ (OBC Jagar Yatra) आयोजन करण्यात आले आहे. (Deputy CM Devendra Fadnavis said the importance of OBC Jagar Yatra)
हेही वाचा – याचा अर्थ पेपर फुटला आहे… धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला
ओबीसी जागर यात्रेला आजपासून (ता. 02 ऑक्टोबर) वर्ध्यातून सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) या यात्रेचा समारोप करणार आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. ज्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडून ओबीसी जागर यात्रेची माहिती देण्यात आली.
ओबीसी जागर यात्रेबद्दल सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजपासून पक्षाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी जागर यात्रेची सुरुवात करणार आहेत. या यात्रेचा समारोप मी करणार आहे. ही जी यात्रा आहे ती विशेषतः ओबीसी समाजाकरिता राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचविणे, त्यांच्यामध्ये जागृती करणे, त्या योजनांचा खरा लाभ हा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे, असा उद्देश या जागर यात्रेचा आहे.
तसेच, भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही जागर यात्रा सुरू झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही यात्रा जाणार आहे. त्यानंतर त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्यासह या ओबीसी योजनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागरूकता पसरविण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली.
ओबीसी समाज हा भाजपचा पारंपारिक मतदारवर्ग असला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. ज्यानंतर या समाजाला पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या पारंपारिक मतदार वर्गाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पारंपारिक मतदारांपेक्षाही आज ओबीसींकरिता अनेक योजना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तयार केलेल्या आहेत.
तसेच, नुकतेच विश्वकर्मा योजना ही मायक्रो ओबीसी समाजाकरिता तयार करण्यात आली आहे. या योजनेमुळे ओबीसी समाजाचे चित्र बदलले जाणार आहे. 13 हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला दिलेले आहेत. त्यामुळे या सर्व योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे, हा या जागर यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.