घरमहाराष्ट्रदादांच्या पसंतीचे देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी

दादांच्या पसंतीचे देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी

Subscribe

राज्यामध्ये सोमवारी पुन्हा एकदा आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवारी करण्यात आलेल्या सहा बदल्यांमध्ये अजित पवार यांच्या पसंतीचे डॉ. राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते.

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातच अनेक दिवसांपासून पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या जागेवर अनुभवी अधिकार्‍यांना संधी मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार राजेश देशमुख यांची सोमवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी कामाची पावती म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जागा रिक्त होती.

- Advertisement -

राम यांची पीएमओमध्ये नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. डॉ. राजेश देशमुख यांच्या लोकाभिमुख कामगिरीमुळे त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेश देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून देशमुख यांचा अजित पवार यांच्याशी संपर्क वाढला. आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम पाहिले आहे.

डॉ. राजेश देशमुख हे २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम पाहिले आहे. शिवाय, यवतमाळ येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने तब्बल २२ शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. फवारणीद्वारे विषबाधा होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची पहिलीच घटना होती. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी डॉ. राजेश देशमुख यांनी कंबर कसली होती. डॉ. राजेश देशमुख यांनी यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली होती. त्याचा परिणाम दिसून आला असून गेल्या दोन वर्षांत विषबाधेने एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी पद स्विकारल्यानंतर पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावर असणार आहे.

- Advertisement -

परीक्षेच्या गोंधळात संदीप कदम यांची बदली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असताना सीईटी सेलच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा कधी होणार असा गोंधळ असताना गेल्या आठ महिन्यांपासून सीईटीची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या आयुक्त संदीप कदम यांची भंडाराच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कदम हे मूळचे नाशिकचे असून, ते यापूर्वी हिमाचल प्रदेशमधील चम्बा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालयाच्या प्रधान सचिवपदी एस. ए. तागडे, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी पराग जैन, औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी सुनील चव्हाण, हाफकिन औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -