घरमहाराष्ट्रनाशिकजिंदाल कंपनी अपघाताचे सविस्तर वृत्त

जिंदाल कंपनी अपघाताचे सविस्तर वृत्त

Subscribe

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

इगतपुरी/नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील पॉलिफिल्मची निर्मिती करणार्‍या जिंदाल कंपनीत एका प्लांटमध्ये रविवारी (दि.१) सकाळी बॉयलरच्या स्फोटाने भीषण आग लागली. त्यात दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून, १९ कामगार जखमी झाले. त्यातील चौघे गंभीर आहेत. ही आग एवढी भीषण होती की, घटनास्थळापासून चार किलोमीटर दूर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गदेखील त्यामुळे प्रभावित झाला होता. दुपारच्या सुमारास तर कंपनीच्या परिघात काळे ढग जमून संपूर्ण आकाश झाकोळून गेले होते. सुमारे शंभर फूट उंच आगीच्या ज्वाला निघत होत्या.

जिंदाल कंपनीजवळ मुंबई आग्रा महामार्गालगत आणि कंपनीला आग लागल्याने मुंबईहून दिल्लीकडे जाणार्‍या विमानाच्या मार्गात बदल करण्यात आला. या आगीची माहिती घेण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. रात्री १० पर्यंत १९ जखमी कामगारांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील दोघा महिलांचा मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापक एन एच. मधुबोल यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना आगीबाबत माहिती दिली.

- Advertisement -

कारखान्यातील एसएसपी-२ या प्लांटमध्ये रविवारी (दि.१) सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेच्या शीपमध्ये सुमारे १०० कामगार काम करत होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान बॉयलर क्षमतेपेक्षा अधिक गरम झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. त्यात जखमी झालेल्या १९ कामगारांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग विझावण्यासाठी इगतपुरी, निफाड, पिंपळगांव बसवंत आदी तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून अग्निशमन पथकाच्या २० ते २५ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. कंपनीत २५ रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या.

घटनास्थळी केंद्रिय आरोग्यमंत्री भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

- Advertisement -

हायलाइट्स 

  •  दुर्घटनेत २ महिला व २ पुरुष ठार , १४ कामगार जखमी
  • धूराच्या लोटांमुळे महामार्गावर वाहतूककोंडी
  •  मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली जखमींची भेट
  • मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
  • धुरामुळे दिल्ली विमानसेवा मार्गात बदल

दिवसभरातील घटनाक्रम

  • सकाळी ११ वाजेदरम्यान जिंदाल कंपनीतील एका प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन कामगारांमध्ये गोंधळ उडाला
  • स्फोटामुळे इगतपुरी तालुक्यातील २५ गावांना हादरे बसले.
  • स्फोटानंतर कंपनीत आग लागली. त्यानंतरही दिवसभरात १९ स्फोट झाले.
  • जखमींना नाशिक ट्रॉम केअर सेंटर व सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
  • महामार्ग ते घटनास्थळ हे अंतर ४ किमी व नाशिकपासून ४१ किमी असले तरी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
  • इगतपुरी, निफाड, पिंपळगाव बसवंत, नाशिक महापालिकेसह जिल्ह्याच्या विविध भागांतून अग्निशमन पथकाच्या 30 हून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर, 25 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
  • कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येऊन हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
  • दुपारी ४.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडहून नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर घटनास्थळी गेले.
  • रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

कंपनीने मुख्यमंत्र्यांना दिली चुकीची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिंदाल कंपनी प्रशासनाने चुकीची माहिती दिली. या कंपनीत एकूण सात हजार कामगार काम करत असून, कंपनी व्यवस्थापनतर्फे फक्त १२०० कर्मचारी काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिंदाल कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस होते एसपींच्या संपर्कात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंदाल दुर्घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. ते सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी लष्कराचे दोन हेलिकॉप्टरसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरु होते. अतिरिक्त अग्निशमन दल पाचारण करण्यात आले होते, अशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर दिली.

थरारक अनुभव : बॉम्ब फुटल्यासारखा स्फोट झाला आवाज

सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कोळशाची गाडी घेऊन जिंदाल कंपनीत पोहोचलो. आमच्यासोबत इतरही वाहने उभी होती. कोळशाची गाडी खाली करत असताना बॉयलर हिट होऊन बॉम्ब फुटल्यासारखा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा आम्ही हादरलो. काही क्षणात गाडी लावलेल्या दरवाजात आगीचे लोळ उठले. दरवाजातून अनेक कामगार भाजलेल्या अवस्थेत बाहेर पडल्याचे पाहिले अन् अंगावर काटाच उभा राहिला. तितक्यात आगीने रौद्ररूप धारण केले होते. घाबरलेल्या अवस्थेत इतर कामगारांना बाहेर पडा, असे सांगून आम्ही कोळसा खाली न करता बाहेर पडलो, असे एका प्रत्यक्षदर्शी कामगारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी : मुख्यमंत्री

या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. जखमी झालेल्या रुग्णांसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोड दौर्‍यावर असताना त्यांना नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला भीषण लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी सिल्लोडमधील सभा रद्द करुन ते तात्काळ नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी सायंकाळी मुंबईनाका परिसरातील सुयश हॉस्पिटलमध्ये जखमी कामगारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीतील दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या कामगारांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातत्याने यंत्रणांच्या संपर्क आहे. दोन हेलिकॉप्टरमार्फत दोन कामगारांना रेस्क्यू करण्यात आले आहे. ही घटना दुर्दैवी आहे. सुयश हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची भेट घेतली आहे. डॉक्टरांशी संवाद साधला आहे. जखमी कामगारांवर डॉक्टर उपचार करत आहेत. मृत कामगारांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये राज्य शासनातर्फे दिले जातील तर, जखमी रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य सरकारकडून केला जाईल.

..तर जिंदालमध्ये दुर्घटना घडलीच नसती : जाधव

जिंदाल कंपनीत आपत्तीकालीन यंत्रणा सज्ज ठेवली असती व सुरक्षा अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार उपाययोजना केल्या असत्या तर कामगारांचा मृत्यू आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसते. या पार्श्वभूमीवर कंपन्यांमध्ये जिवीतहानी टाळण्यासाठी व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी औद्योगिक धोरणांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. उत्पादनासह कामगार व मालमत्तेच्या सुरक्षेला महत्व दिले पाहिजे, अशी माहिती निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले की, जिंदाल कंपनीतील दुर्घटनेस समन्वय व व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे दिसून आले. दुर्घटनेनंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकार्‍यांसह इतर यंत्रणा बजावकार्य करताना दिसून आल्या. मात्र, कंपनीची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बचावकार्य करताना दिसून आली नाही. कोणत्याही कंपनीत आगीसह इतर दुर्घटना घडू नयेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवावे लागते. राज्य शासनातर्फे सुरक्षा अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाते. हे अधिकारी कंपनीतील कामगार व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अहवाल तयार करतात. या अहवालातील सूचनांची कंपनीमालक व व्यवस्थापनाने उपाययोजना केली पाहिजे. मात्र, कंपनीमालक व व्यवस्थापन फक्त कंपनीच्या उत्पादनाकडे लक्ष देतात. परिणामी, कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

सुटकेच्या प्रयत्नात गमावला जीव

जिंदाल कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने कामगार सुटकेसाठी प्रयत्न करू लागले. मात्र, कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने आणि आगीने रौद्ररुप धारण केल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील दोन महिला कामगारांचा कंपनीतच मृत्यू झाला. जिंदाल कंपनीत कामगार नेहमीप्रमाणे रविवारी (दि.१) सकाळी ८.३० वाजता कामावर हजर झाले होते. यामध्ये अनेक कामगार बिहार, मध्यप्रदेशासह इतर राज्यातील आहेत. सर्व कामगार आपापल्या विभागात काम करत होते. सकाळी ११ वाजेदरम्यान कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीतील कामगारांची पळापळ झाली. कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने सर्व कामगार भयभीत झाले होते. कंपनीतून बाहेर जाण्यासाठी प्रत्येक कामगार प्रयत्न करत होता. स्फोटादरम्यान दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ नाशिक ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सचिन बंगाळे यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. कंपनीच्या अधिकार्‍याने या महिला स्फोट झाल्या त्या ठिकाणी होत्या. त्यांना बाहेर कोठून जायचे, ते समजले नाही. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले

सुरक्षिततेसाठी एआय, रोबोटचा वापर उद्योगांमध्ये वाढावा

मानवी त्रुटी, चुका, निष्काळजीपणा टाळण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), हायपरऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), मशीन लर्निंग (एमएल) इ. तंत्रज्ञानाबरोबरच नाफ्ता, हायड्रोजन इ. ज्वलनशील पदार्थ हाताळताना कोबोटचा (कोलॅबोरेटिव्ह रोबोट) वापर इंडस्ट्रीमध्ये सुरक्षिततेसाठी वाढविणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक तांत्रिक मदतीस तयार आहोत.
– प्रा. किरणकुमार जोहरे, माजी प्रॉडक्शन्स ऑफिसर, थायसेनक्रूप इलेक्ट्रिकल स्टील इंडिया, इगतपुरी

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -