माझ्या मताचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका, आमदार भुयारांची खोचक टीका

devendra bhuyar

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा चुरस होताना पहायला मिळणार आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहे. एकूण १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणार आहेत. दरम्यान, माझ्या मताचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका, अशी टीका अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

देवेंद्र भुयार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर संजय राऊतांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर केली होती. तसेच काही आमदारांनी पाठिंबा न दिल्यामुळे आणि निवडणुकीत घोडेबाजार केल्यामुळे मविआचा पराभव झाला, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचेही नाव होते. दरम्यान, माझ्या मताचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका. असं भुयारांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांना माझ्यासोबतच मतदान करताना पाठवा, अशी मागणी मी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार आहे. मी त्यांच्यासोबत मतदान करणार आहे. नाहीतर माझा मत करण्याचा अधिकार संजय राऊत यांना देऊन टाका म्हणजे शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही. असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीला गुप्त मतदानाचा धोका नाही. एका जागेसाठी निवडणूक चुरशीची आहे. या एका जागेसाठी मतदानासाठी संपर्क साधण्यात येत असेल तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आमचा सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी कुठेही अडचण वाटत नाही. महाविकास आघाडीला ज्यांनी समर्थन दिले आहे. ते पुन्हा आम्हाला मतदान करतील. पुढील अडीच वर्ष आमचेच सरकार आहे. असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज हितेंद्र ठाकुर यांची भेट घेतली होती. त्यामुळे हितेंद्र ठाकुर नक्की कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश