मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सर्वच पक्षांनी आपला उमेदवार जिंकावा, यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात दौरे केले आणि सभा घेतल्या. त्यानंतर सोमवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजता प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार असून मनसे, वंचित इत्यादी पक्षदेखील स्वतंत्र लढा देणार आहेत. अशामध्ये यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्याचे समोर आले आहे. (Devendra Fadanvis BJP leader election rallies and meetings in Maharashtra for Assembly Election)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोड शो आणि सभा घेतल्या. यामधील दिवाळीनंतर झालेल्या 50हून अधिक सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांमध्ये घेतल्या आहेत. म्हणजेच सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. सोमवारी (18 नोव्हेंबर) वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली. हा प्रवास त्यांनी 25 हून अधिक जिल्ह्यात केला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलेल्या योजना आणि त्या संदर्भातील विषयानिगडीत मुद्दे मांडले.
तसेच, लाडकी बहीण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरुन 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचसोबत स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले? अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या या सभांचा आता भाजपला कसा फायदा होतो? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.