नागपूर : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा आहेत. अशामध्ये एकनाथ शिदेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच, यावेळी माध्यमांसमोर पुन्हा एकदा, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुम्ही मुख्यमंत्रिपदावर बसावे,’ यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हातच जोडले. त्यामुळे अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार का? यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. (Devendra Fadanvis BJP on Eknath Shinde stand and CM Ship)
“आम्ही सगळे एकत्रच आहोत. मी, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार असो, आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीआधीदेखील सांगितले होते की, सर्व निर्णय हे आम्ही सोबतच घेऊ. आमचे पक्षश्रेष्ठीदेखील या निर्णयांमध्ये आमच्या सोबत असतील.” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “तरीही कोणाच्या मनात काही शंका असतील तर ते आज एकनाथ शिंदे यांनी तेदेखील दूर केलेले आहेत. पुढील प्रक्रीयेसाठी पक्षश्रेष्ठींसोबत आम्ही बैठक होईल.” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याचवेळी त्यांना भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कोणतेही विधान न करता त्यांनी हातच जोडले आणि अधिकचे बोलणे टाळले.
दरम्यान, महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. त्यानंतर 4 दिवस उलटूनही मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. तर, एकीकडे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात यावे अशी शिवसेनेतील नेत्यांची मागणी होती. तसेच, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात होते. अशामध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या अनेक चर्चा होत्या. पण अखेर यावर पूर्णविराम देत, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. तसेच, भाजप जो काही निर्णय घेईल त्यात एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा पाठींबा असल्याचेदेखील त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग पोकळा झाला आहे.