मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणी बांगलादेशी असलेल्या शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आहे. परंतु, शरीफुलच्या फिंगरप्रिंटचे नमुने सैफ अली खानच्या घरात सापडलेल्या फिंगरप्रिंटशी जुळत नाहीत, असा दावा केला जात आहे. त्यामुळे शरीफुलच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
पोलिसांनी न सांगितलेल्या गोष्टींवर बोलून अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : शिंदे गटात नवा ‘उदय’ होणार, राऊतांच्या दाव्यावरून सामंतांनी सुनावले; म्हणाले, असे चाळे…
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला मध्यरात्री एका चोरानं हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीवर, मानेवर गंभीर जखम झाली होता. सैफच्या पाठीत चाकू भोसकल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या 40 पथाकांनी 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शरीफुलला ठाण्यातून अटक केली. परंतु, सैफच्या घरातून एकूण 19 बोटांचे नमुने ( फिंगरप्रिंट ) घेण्यात आले होते. त्यातील एकही शरीफुलशी जुळत नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे शरीफुलच्या अटकेवर सवाल उपस्थित होत आहे.
याबद्दल मुंबईत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी स्पष्ट करतो की ज्या गोष्टी अधिकृत नाहीत, पोलिसांनी त्यावर भाष्य केले नाही, त्यावर सतत चर्चा करून संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. याप्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहेत. पोलीस अंतिम तपासाकडे जात आहेत. अधिकची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देतील.”
हेही वाचा : छावा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावे, नजरचुकीनं जर…; उदय सामंतांनी स्पष्ट केली भूमिका