घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या इशार्‍याने मुंबईत हिंसाचार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍याने मुंबईत हिंसाचार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Subscribe

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या, तर राज्यात अन्यत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशार्‍यावर हिंसाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. केरळ, पश्चिम बंगालमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली. आता तीच परिस्थिती महाराष्ट्रात असून कुणी हिटलर प्रवृत्तीने वागत असेल तर त्यांच्याशी संवाद नाही, तर संघर्ष करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.

बलिदानाला आम्ही घाबरत नाही. त्यामुळे आमच्यावर ठोकशाही कराल, तर आम्ही ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर झालेली कारवाई, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पदाधिकारी मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि भोंग्यांचा मुद्दा या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली.

- Advertisement -

राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि मशिदींवर भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती, मात्र ज्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत आणि गृहमंत्र्यांना काही अधिकार नाहीत तर त्या बैठकीला जाण्यात काय अर्थ, असा सवाल फडणवीस यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत, त्या पाहिल्या तर या सरकारने संवादाला जागा ठेवली आहे असे वाटत नाही. हिटलरी पद्धतीने वागणार्‍यांशी संवादापेक्षा संघर्ष करणे कधीही संयुक्तिक आहे. विरोधकांना जीवानिशी संपवायचे असे सत्ताधार्‍यांना वाटत आहे.

पोलीस संरक्षणात हल्ले होणार असतील आणि गुन्हे नोंदवले जात नसतील तर बैठकीला जाण्यात अर्थ नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. पोलखोल सभांमधून आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार मांडला. त्यामुळे चिडून आमच्या पोलखोल सभांवर, रथावर हल्ला केला. असे हल्ले करून आमचा आवाज बंद करू असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढूच, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला. मोहित कंबोज यांचे मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणा हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यांना तरुंगात टाकले. त्यांना तरुंगात सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांना पाणी दिले जात नाही. वॉशरूमला जाऊ दिले जात नाही. अनेक धादांत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का?

महाराष्ट्रात हनुमान चालिसा जर म्हणायची नाही, तर पाकिस्तानात म्हणायची का, असा सवाल करत फडणवीस म्हणाले की, नवनीत राणा हनुमान चालिसा म्हणणार होत्या, त्यांना इतका विरोध का? हनुमान चालिसा महाराष्ट्रात म्हणायची नाही, तर पाकिस्तानात म्हणायची का? हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह असेल तर तो आम्ही दररोज करू. मुख्यमंत्र्यांचे हे वर्तन महाराष्ट्राला लज्जा आणणारे आहे. आज नवनीत राणा यांना जी वागणूक दिली जातेय, ते पाहून लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे कुठे गेले? राणा यांना दलित असल्याची जाणीव करून दिली जात असताना महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपले आहे का, असा सवालही उपस्थित होतो.

हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांना पत्र

केंद्राची सुरक्षा असलेल्यांवर पोलीस संरक्षणात हल्ले होत असतील तर ते गंभीर आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सध्या मुंबईत जे घडत आहे ते मुख्यमंत्री कार्यालयातून घडत आहे आणि राज्यात आमच्या नेत्यांवर तक्रारी आणि हल्ले होत असून त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -