मुंबई : लोकसभेतील पराभवानंतरही खचून न जाता प्रचारसभा गाजवण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाताशी धरत यशस्वीरित्या बूथ मॅनेजमेंट करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडावी यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात 45 पारचा दिलेला नारा भाजपाला यशस्वी करून दाखवता आला नव्हता. 28 जागा लढवूनही भाजपाला केवळ 9 जागा जिंकण्यातच यश आले होते. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती, परंतु हे अपयश पचवून पुन्हा कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधासनभा निवडणुकीत कसर भरून काढली. (Devendra Fadnavis as Maharashtra Chief Minister Maratha or OBC face)
महायुतीत सर्वाधिक जागा लढवतानाच भाजपाच्या 12 नेत्यांना शिवसेना, राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी मिळवून दिली. याच जोरावर भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. शिवाय शिवसेनेच्या तिकिटावर 7 जण आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2 जण विजयी झालेल्या भाजपा नेत्यांची संख्या जोडल्यास हा आकडा 141 वर जातो. याचे श्रेय भाजपा नेत्यांकडून फडणवीसांनाच दिले असल्यानेच तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवल्यानंतर पालिका निवडणुकांचा रस्ता मोकळा झाल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिकेवर आतापर्यंत ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे, परंतु शिवसेनेतील फूट आणि विधानसभा निकालानंतर राजकीय गणिते कमालीची बदलली आहेत. मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या हातातून खेचून घेणे हेच भाजपाचे यापुढील लक्ष्य असेल. त्याकरिता मुख्यमंत्रीपदी आपल्यालाच कायम ठेवावे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपा श्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपदावरील दावा कायम ठेवल्याचे कळते, मात्र मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच राहावे यावर भाजपा नेत्यांमध्ये एकमत आहे. त्यातही विरोधकांची कोंडी फोडून भाजपाला आतापर्यंतच्या सर्वाधिक 132 जागांचा आकडा गाठून देणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडावी, असा भाजपाच्या आमदारांचा आग्रह आहे. नागपुरात तर फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्सदेखील लागले आहेत. यावरून फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच भाजपा कार्यकर्त्यांची भावना असल्याचे दिसते.
हेही वाचा – Shankaracharya : आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा आशीर्वाद; आता म्हणतात भाजपाचा विजय हा दैवी संकेत
महायुतीने विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते आले, मात्र राज्यात खर्या अर्थाने भाजपाचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांनीच केले. देवाभाऊ टॅगलाईन घेऊन लाडकी बहीण योजनेचा प्रचार असो किंवा प्रचाराच्या अंतिम टप्प्यावर बटेंगे तो कटेंगेच्या जोडीला वोट जिहादचा काढलेला मुद्दा कमालीचा प्रभावी ठरला. वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देऊन फडणवीसांनी विरोधकांचे संविधान नष्ट करण्याचे नॅरेटिव्ह आक्रमकपणे मोडीत काढले. तत्पूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विश्वासात घेऊन यशस्वीरित्या जागावाटप केले. हे जागावाटप करतानाच देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चाणाक्षपणे 17 उमेदवारांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवले. यापैकी 9 उमेदवार निवडणुकीत जिंकले आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये भाजपचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. मित्रपक्षांच्या तिकिटावर विजयी झालेल्या भाजपा नेत्यांची संख्या आणि अपक्षांचा पाठिंबा जोडल्यास हा आकडा 141 वर जातो. हे सारे यश देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीमुळेच मिळाल्याने ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतात, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
अमित शहा आज मुंबईत, धक्कातंत्राचा वापर
विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कुणाची निवड करायची, असा पेच भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पुन्हा ब्राम्हण चेहरा देण्याऐवजी मराठा किंवा ओबीसी नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याचे भाजपामध्ये घाटत असून आज यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत केंद्रीय निरिक्षक म्हणून येत आहेत. भाजपामध्ये संभाव्य मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ या मराठा चेहर्यांसह गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, या ओबीसी नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेत्यांना बाजूला काढून नव्या चेहर्याला संधी दिली होती. त्यामुळे भाजपाकडून राज्यात राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जाण्याच्या चर्चेने जोर धरल्याने भाजपात कमालीची शांतता आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : सभागृहात थोरातांची कमी सर्वांना जाणवेल; पराभवावर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
48 तास उलटूनही भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय नाही
भाजपाला 2014 मध्ये 123 जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर 2019 मध्ये फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटत होते, मात्र शेवटच्या क्षणी भाजपाश्रेष्ठींनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला. आता 2024 च्या निवडणुकीत भाजपाला सार्वधिक जागा मिळाल्याने पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, अशी भाजपा नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे, मात्र विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि मराठा समाजाने भाजपाला भरभरून मते दिल्याने भाजपाश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदाबाबत वेगळा निर्णय घेऊन धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. 15 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 48 तास उलटून गेले तरी भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नाही.
फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी भाजपाचे आमदार आग्रही
पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवले असून एकट्या भाजपाला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे
नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सातत्याने पुढे केले जात आहे. खरंतर भाजपाकडून दिल्लीहून निरीक्षक पाठवून आणि भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करून त्यात नेता निवडीची प्रक्रिया पार पडण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर अपेक्षित आहे, मात्र दिल्लीतून याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने फडणवीस समर्थकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस सातत्याने भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेत आहेत. भेट घेणारे सर्व आमदार मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्यासाठी प्रचंड आग्रही आहेत.
हेही वाचा – Marashtra Assembly Result : तोडीस तोड उमेदवार, तरीही महाडमध्ये भरत गोगावले विजयी, बदलाची चर्चा निष्फळ
शिंदे आमदारांची भूमिका काय?
एका बाजूला भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होत नसताना दुसर्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून ही निवडणूक लढवली असल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, अशी भूमिका शिंदे गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. भाजपाला वाटते आपला मुख्यमंत्री व्हावा, पण आम्हाला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणूक लढवली. त्याचा फायदा महायुतीतील सर्वच पक्षांना झाला. आमच्या जागा वाढल्या आहेत, कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका शिंदे सेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून जे काम केले ते सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे आमदार भरत गोगावले यासंदर्भात बोलताना म्हणाले, तर ज्यांच्या नेतृ्त्वाखाली निवडणुका लढल्या जातात त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केले जाते ही उदाहरणे भाजपने, एनडीएने दिलेली आहेत. तोच पॅटर्न महाराष्ट्रात होईल असे आम्हाला वाटते, असा विश्वास शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे यांच्यासाठी देवाला साकडे
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, महाआरती करून देवाला साकडे घालण्यात आले. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाची आरती केली आणि साकडे घातले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीमुळे आजारातून बरे झालेल्या शेकडो रुग्णांनी सोमवारी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना केली.
हेही वाचा – Aaditya Thackeray : मुख्यमंत्री कोण कळले का? त्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा उलट सवाल…