पुणे : 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी बहुमत मिळालं होते. पण, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चूल मांडली. भाजपला विरोधी पक्षात बसाव लागलं. बाकी 2022 मधील सत्ताबदल ते 2024 पर्यंतचा राजकीय प्रवास सगळ्यांना माहिती आहेच… परंतु, 2019 हे वर्ष आले नसते, तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागील दहा वर्षांत 2019 हे वर्ष आले नसते, तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता. 2019 ते 2022 या कालावधीत विकासाला खीळ बसली होती. 2022 नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असे मी खात्रीनं सांगतो.”
हेही वाचा : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, ‘सीआयडी’ला ‘ती’ रेकॉर्डिंग सापडली; आता…
“2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मी कधी मंत्रीही झालो नसताना थेट मुख्यमंत्री झाल्यानं हा काही करू शकेल की नाही या विचारनं 2014 ला लोक संशयानं बघायचे. पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो आहे. मी काय करू शकतो किंवा माझी क्षमता काय ते लोकांनी अनुभवले आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“एक व्यक्ती म्हणून अनेक आव्हानांचा सामना केला की त्यातून आता परिपक्वता आली आहे. मला आता आव्हानांची चिंता वाटत नाही किंवा मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलताना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचं, असा माझा प्रयत्न असणार आहे,” असं पुढील धोरण फडणवीसांनी सांगितलं आहे.
“महाराष्ट्र पुढील पाच वर्षांत सर्व क्षेत्रात पुढे असेल. देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून राज्याची ओळख निर्माण झालेली असेल. या परिवर्तनाच्या काळात सर्वसामान्य माणसांचे स्वप्न पुढील पाच वर्षांत पूर्ण होईल,” असं आश्वासन फडणवीसांनी जनतेला दिलं आहे.
हेही वाचा : ‘ठाकरे गट झोपलेला,’ अमोल कोल्हेंच्या विधानावरून राऊतांनी सुनावलं; म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की…”