Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Subscribe

अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यांमध्ये २४२ गावं ही अवकाळी पावसाने बाधित आहेत. यावेळी ७ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. ७ हजार ५९६ अशा एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. यासंबंधित पंचनामे सुरू झाले आहेत. आतापर्यंत ३ हजार २४३ पर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या ४ हजार १५८ इतक्या हेक्टरपर्यंत आम्ही पंचनामे पूर्ण करू, तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने तात्काळ मदत दिली जाईल, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केली.

काही ठिकाणी विशिष्ट ठिकाणातील गावं बाधित होत आहेत. विविध प्रकारचे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरावतीत तीन वेळा अशा प्रकारची आपत्ती आणि संकट ओढावलेलं आहेत. मागाील आपत्तीचे पंचनामे पूर्ण करून त्याची पाहणी करण्यासाठी पात्र करण्यात आलं आहे. यासंदर्भात आपण पंचनामे पूर्ण करू. गारपीटग्रस्त आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे राहिल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

काल अकोला जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेडवर झाड पडून घडलेल्या घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ३५ जखमी झाले. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जखमींवर उपचारांचा खर्च करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

आज अमरावतीतील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत बैठकी घेण्यात आल्या. पीएम मित्राअंतर्गत अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर झाला आहे. यासाठी २२० हेक्टर जागेचे भूसंपादन झालेले आहे. पुढच्या १५ दिवसांत उर्वरित संपूर्ण भूसंपादन पूर्ण होईल. जे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार करुन पायाभूत सुविधा निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. रेमंडसारख्या उद्योजकांशी गेल्याच आठवड्यात आपली चर्चा झाली असून किमान १५ विविध कंपन्यांशी राज्य सरकार संपर्कात आहे. कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून गारमेंटपर्यंत अशी ही इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात मोठा विकास यातून होईल, कापूस उत्पादकांना लाभ होईल आणि तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होईल. जिनिंग-प्रेसिंगपासून सर्व संलग्न उद्योग या टेक्स्टाईल पार्कमध्ये असतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. दोन महिन्यात त्यांचा अहवाल येईल. दोन वर्ष बांधकामाला लागू शकतात. पण, तोवर उपलब्ध इमारतींतून कामकाज सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून लवकरात लवकर विद्यापीठाचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात नवीन वाळू धोरण तयार झाले आहे. वाळूमाफियांना यामुळे चाप बसणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एलनिनोसारखी परिस्थिती उदभवली तर काय उपाययोजना करायच्या, यासाठी शासनाने आधीच एक समिती गठीत केली आहे. त्यामुळे तशी स्थिती उदभवल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या, यादृष्टीने शासनाने आधीपासूनच तयारी प्रारंभ केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट नाशिकला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अमरावती दौऱ्यावर निघाले आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गारपीट आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बांधावर जाऊन भेट घेणार आहेत. प्रशासन पोहोचेपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहे.


हेही वाचा : कसबा पेठनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी धंगेकरांच्या नावाची चर्चा? भाजपचं टेन्शन


 

- Advertisment -