घरमहाराष्ट्र'सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा' - देवेंद्र फडणवीस

‘सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा’ – देवेंद्र फडणवीस

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे. हे सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर पोटनिवडणुकीसाठीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे आहेत. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने नव्या चर्चांणा उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख प्रकरणावरुन देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

“लोकं विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदलतंय का? सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण,” असं सूचक विधान फडणवीस यांनी केली. “पण या एका मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. लोकशाहीमध्ये या सरकारचा अनाचार, दुराचार, भर्ष्टाचार आणि अत्याचार…या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी पहिली संधी जर कोणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा-पंढरपूर नागरिकांना मिळाली आहे,” असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“सरकार स्थापन झालं तेव्हा नाव होतं महाविकास आघाडी. एक वर्षानंतर महाविनाश आघाडी…आता याचं नाव झालं महावसूली आघाडी…यांना वसूली फार चांगली जमतेय, सगळे मिळून वसूलीला लागले आहेत. जिथे जाऊ तिथे खाऊ आणि फावड्यानं ओढून नेवू अशा प्रकारची अवस्था या सरकारमध्यल्या मंत्र्यांची झाली आहे,” असा घणाघात फडणवीस यांनी केला. फडणवीस यांनी अनिल देशमुख प्रकरणावर देखील भाष्य केलं. “जे काही मुंबईमध्ये घडलं ते भयानक आहे. पोलिसांना जर हफ्ते वसूलीसाठी नेमून दिलं जात असेल तर तो स्वत:च्या खिशातून देत नाही आहे, तो गोर गरीबांना त्रास देत पैसे काढतोय. यांच्या वसूलीमुळे सामान्य माणूस पोलीस स्टेशनवर गेला तर त्याला न्याय मिळत नाही ही अवस्था झाली आहे. गांधी दर्शनाशिवाय न्याय नाही. मुंबई पोलीस दलाची स्कॉटलंड यार्डसोबत तुलना केली जात होती, परंतु आज मुंबई पोलीस दलातून वेगवेगळे किस्से समोर येत आहेत,” असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना, गोरगरीबांना या सरकारने एक पैशाची मदत केलेली नाही. “आता सरकारमध्ये बसले आहेत ते मागे बांधावर जाऊन तुम्हाला ५० हजार हेक्टरी नुकसान भरपाई, दीड लाख बागायतीला मदत देऊ, असं आश्वासन देणाऱ्यांनी ५० हजार, दीड लाख सोडा दोन हजार सुद्धा दिले नाहीत,” असं म्हणत फडणवीस यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॉकशाही’; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -