मुंबई : 2019 मध्ये शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कटुता निर्माण झाली. ही कटुता दूर होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासह शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीनदा भेट घेतली होती.
अलीकडेच भाजपचे ज्येष्ठ नेते, चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात भेट झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपची पुन्हा युती होणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे संबंध खूब खराब आहेत, अशी परिस्थिती नाही. याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत, अशीही परिस्थिती नाही,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा : संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे किडनॅपिंग, अपहरणकर्ते फोन करून म्हणाले, ‘बच्चा चाहिए तो…’
उद्धव ठाकरे आणि तुमच्यात सौहार्दयाचे संबंध निर्माण होत आहेत, याच्यात किती तथ्य आहे? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मिलिंद नार्वेकर येथे बसले आहेत, त्यांना माहिती असेल.”
त्यावर मुलाखतकारांनी म्हटले, “मिलिंद नार्वेकर यांनीच हा प्रश्न विचारण्यास सांगितलं आहे.”
त्यानंतर फडणवीस म्हणाले, “उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार करणार नाही. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. दक्षिण भारतात नेते, जसे एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात, तशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिली नाही. संवाद करायला बोलायला काहीच अडचण नाही.”
“चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटले. लगेच अशा बातमा आल्या की, उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांतदादांनी त्यांना पायघड्या टाकल्या आहेत. असं काहीही नाही. उद्धवजींशी संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही. याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत, अशीही परिस्थिती नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा : अजितदादांच्या ‘NCP’त पुन्हा प्रवेश करण्यापूर्वीच संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या घरावर ‘इन्कम टॅक्स’ची रेड