घरमहाराष्ट्रफडणवीस म्हणतात, 'मागच्या जन्मीच्या पापांमुळेच महापौर-नगरसेवकपद मिळतं'!

फडणवीस म्हणतात, ‘मागच्या जन्मीच्या पापांमुळेच महापौर-नगरसेवकपद मिळतं’!

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भन्नाट वक्तव्यामुळे पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सत्कार समारंभात जमलेल्या उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला!

राज्यात भाजपच्या १०५ जागा निवडून आल्यानंतर देखील माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे ते टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सत्ताधारी महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप चर्चेचा विषय ठरला. मात्र, आज पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते-नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे!

काय म्हणाले फडणवीस?

मागच्या जन्मीच्या पापांमुळेच आपल्याला महापौरपद किंवा नगरसेवकपद मिळतं, अशा आशयाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे महानगर पालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या भाषणात मारलेल्या कोपरखळ्यांनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यातही, त्यांनी मागच्या जन्माविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे तर स्टेजवरील मंडळी देखील हसू लागली. ‘राजकारण्यांसाठी महापौर किंवा नगरसेवक बनणं खूप कठीण असतं. कोणत्याही गोष्टीसाठी या दोघांनाच जबाबदार धरलं जातं. मी देखील माझ्या कार्यकाळात नागपूर महानगरपालिकेत महापौरही राहिलो आहे आणि नगरसेवक देखील राहिलो आहे. मागच्या जन्मी ज्यांनी पापं केली, ते नगरसेवक होतात आणि ज्यांनी महापापं केली, ते महापौर होतात’, असं विनोदी वक्तव्य फडणवीस यांनी करताच सभागृहात हशा पिकला!

- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय अर्थमंत्रीपदाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा!

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांना महापौरपदासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, पूर्वीप्रमाणे एकच वर्षाचा नसून ठराविक काळ महापौरांना मिळाल्यामुळे त्यांना चांगलं काम करता येईल, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -