…अन् नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Devendra Fadnavis criticizes CM in Aurangabad
Devendra Fadnavis criticizes CM in Aurangabad

पाणी प्रश्नावर भाजपने औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चा काढला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजी नगर म्हणतो तर समजून जा. पण मला असे वाटते की पाणी मागयला गेले तर काय म्हणतील. मी म्हणतो संभाजी नगर तर संभाजी नगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफीकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा अन् नळातू येणाऱ्या हवेला पाणी समजा, असे आश्वासन मुख्यमंत्री देतील कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची रेघ असते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पाणी मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार –

मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असे वाटते आता पाणी मगायला गेलो तर काय म्हणतील? ‘दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची काळी रेघ आहे. या बेईमानांच्या बेईमानीमुळे संभाजीनगरला तहाणलेले ठेवले आहे. आमच्या मोर्चाला किती अटी टाकल्या. मात्र, हा जनसैलाब आहे, याला तुम्ही रोखू शकणार नाहीत. आमचे शिवसेनेचे मित्र पोस्टर फाडत होते. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण हा आक्रोश मोडू शकत नाही. ज्यावेळी सात सात दिवस नळातून केवळ हवा येते. त्यावेळी माझी माय माऊली मनात तुम्हाला शिव्या शाप देतेय. ते शिव्या शाप तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. आज तर ऐंशी वर्षाची आजी हंडा घेऊन मोर्चात सहभागी झाली होती. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जी आजी त्यांच्या घरासमोर होती तिच्या घरी गेलात. पण या हंडा घेऊन पाणी मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार आहात? तिच्या व्यथा तुम्ही कधी समजून घेणार आहात का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

संभाजीनगरच्या योजनेसीठी एक पैसा नाही दिला –

संभाजीनगरच्या पाण्यासाठी त्यांनी स्वत:चा एक पैसा नाही दिला. केंद्राचा पैसा वळवला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे संभाजीनगरवर किती प्रेम होते. मात्र, आजच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि एमएमआर शिवाय काहीच माहित नाही. ज्या गतीने हे काम चालू आहे त्यानुसार पुढची 25 वर्ष ते काम होणार नाही. संजय राऊत म्हणतात पुढची 25 वर्ष आमचेच सरकार असेल. हे त्या ठेकेदाराला समजलेले दिसते. मात्र, कुणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. जो जनतेविरोधात जाईल, त्याला ही जनता खाली खेचल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला पहिली संधी मिळणार आहे महापालिका निवडणुकीत. ही महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. रस्त्याच्या कामासाठी मी सव्वाशे कोटी दिले, पण ते ही हे खर्च करु शकले नाहीत. संभाजीनगरला आम्ही जे दिले त्या तुलनेत एक फुटकी कवडी हे सरकार देत नाही अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली

सरकारची कुंभकर्णी झोप उडाली नाही तर –

यावेळी मराठवाडा वैधानिक विकास मंडळांचा मुडदा या सरकारने पाडला. मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला. समुद्रात वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे गोदावरीत आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करत होतो, त्याला स्थगिती दिली.आज संभाजीनगरने महाविकास आघाडीला हलवून टाकले आहे. जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही तोवर भाजप झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. आताही या सरकारची कुंभकर्णी झोप उडाली नाही तर या सरकारला कुणीही वाचवू शकत नाही. या जनतेच्या त्रासाला, त्रागाला तुम्ही वाट मोकळी करून दिली. पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.