सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना  राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत. त्यांना ना संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी पाहिलाय, असा टोला फडणवीसांना आदित्य ठाकरेंना लागवला आहे.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी

देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत. त्यांना ना संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी पाहिलाय. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही तर लाखो कारसेवक आहेत. कितीही थट्टा उडवली तरी आम्हाला गर्व आहे. ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला. त्यावेळी मी स्वत: तिथे होतो. तसेच मी नगरसेवक होतो.

१८५७ चा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. परंतु मला मागील जन्मातही आणि पुर्नजन्मातही विश्वास आहे. त्यामुळे मी कदाचित मागच्या जन्मात जर मी असेन. तर १८५७ च्या युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढत असेन. पण तुम्ही असाल तर त्यावेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल. आता तुम्ही युती अशा लोकांशी केली आहे, जे १८५७ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाहीत. शिपायाचं बंड होतं असं जे म्हणतात, त्यामुळे ठीक आहे त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या, असं फडणवीस म्हणाले.

दोन वर्ष सरकारने टाईमपास केला

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय ते अद्यापही मला समजलेलं नाहीये. पण ते प्राथमिकरित्या समजलेलं आहे ते म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले असून सहा महिन्यापेक्षा जास्त अॅडमिनिस्ट्रेटेड ठेवू शकत नाही. संविधानाने तशी तरतूद केल्यामुळे आपण सहा महिन्यांपेक्षा जास्त ठेवता येत नाही. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हे १०० टक्के सरकारचं फेल्यूअर आहे. दोन वर्ष सरकारने टाईमपास केला आणि ट्रीपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे, असं फडणवीस म्हणाले.

राणा दाम्पत्य जर हनुमान चालिसा म्हणत असेल तर..

राणा दाम्पत्यांना जामीन मिळाला आहे, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावेळी फडणवीस म्हणाले की, राणा दाम्पत्यांना जामीन मिळणं स्वाभाविकच आहे. कारण हनुमान चालिसा म्हणण्याकरीता राजद्रोह लावण्याचा करेंटपणा या सरकारने केला. त्यामुळे अशा प्रकारचा विषय हा कधीच न्यायालयात टिकू शकत नाही. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की त्यांना जामीन मिळाला. राणा दाम्पत्य जर हनुमान चालिसा म्हणत असेल तर एवढ्या भरोश्यावर आणि एका मुद्द्यावर त्यांना तुरूंगात टाकून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकतात. तर भोंग्याच्या संदर्भात त्यांची काय भूमिका असेल ही आपल्या सर्वांना कल्पनाच आहे. पण मला असं वाटतं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं ही जबाबदारी सरकारची आहे. ही कोणत्याही पक्षाची नाहीये. सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल आणि ती मांडली आहे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : भोंगा प्रकरण…राज्यात तणाव…खोपोलीत मात्र ऑल इज वेल