मुंबई : संसदेच्या संयुक्त समितीने (JPC) आज, बुधवारी (29 जानेवारी) वक्फ (Waqf Amendment Bill) विधेयक 2024 च्या मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयावर विरोधी पक्ष नाराज झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधेयकाबाबत असहमती पत्र सादर केले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले की, काँग्रेसप्रमाणेच अल्पसंख्याक लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झाले आहे. (Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray for opposing the Waqf Amendment Bill)
दिल्लीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वक्फ सुधारणा विधेयकला उद्धव ठाकरे यांनीही विरोध केल्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मला असे वाटते की, गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतलेली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभे राहायचे ही काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा होती. मात्र आता अल्पसंख्याक लांगूलचालनाची ती परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली आहे. हे पाहून मला अतिशय दुःख झाले आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
हेही वाचा – Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? फडणवीसांनी चेंडू अजित पवारांकडे टोलावला
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वक्फ बोर्डाचे बिल कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. मुस्लिम समाजाच्या तर बिलकुल विरोधात नाही. वक्फच्या माध्यमातून जो गैरकारभार आणि गैरव्यवहार चाललेला आहे तो संपला पाहिजे म्हणून हे विधेयक आणले आहे. असे असतानाही फक्त मतांच्या लाचारी करता ते (ठाकरे गट) विरोध करत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रातील जनता हे पाहते आहे. कशाप्रकारे ते (ठाकरे गट) लांगूलचालन करत आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वक्फ विधेयकाविरोधात असहमती पत्र सादर
दरम्यान, शिवसेना (उद्धव गट) खासदार अरविंद सावंत यांनी वक्फ विधेयकाविरोधात असहमती पत्र सादर केले आहे. त्यांनी म्हटले की, या विधेयकाबाबत गोंधळ पसरवला जात असल्याने मी असहमती पत्र सादर केले आहे. हे विधेयक न्यायासाठी नाही तर राजकीय हेतूंसाठी पुढे आणले जात आहे. यासाठी आता संविधानाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. हे लोक वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांना समाविष्ट करण्याबद्दल बोलत आहेत, त्यामुळे भविष्यात मंदिरांच्या व्यवस्थापनावरही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अरविंद सावंत यांनी बोलून दाखवली होती.