मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने तीन दिवसांत 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 54 सामंजस्य करार केले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी विरोधक या दौऱ्यावरून टीका करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत एमओयूची यादी श्वेतपत्रिकेप्रमाणे दाखवण्याची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis demands that the list of MoUs signed during Davos visit be shown as a white paper)
महाराष्ट्र सरकारने जर 16 लाख कोटींचे एमओयू केले असतील, तर अभिनंदन आहे. पण आपण जर मागचा इतिहास पाहिला तर एमओयू होतात आणि त्याचं पुढे काहीच होत नाही. 16 लाखांपैकी माझ्या माहितीप्रमाणे 80 टक्के कंपन्या पुणे, मुंबई आणि धाराशिवच्या आहेत. त्यामुळे दावोसला जाऊन एमओयू करणं आणि फोटो काढण्याची हौस असेल तर तसं तुम्ही जरूर करावं. पण अशा गोष्टी करून तुम्ही महाराष्ट्रातल्या बेरोजगार लोकांच्या डोळ्यात धुळ फेकत आहात.
हेही वाचा – Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय, चव्हाण यांचा आरोप
आमची मागणी आहे की, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा दावोसला गेले होते, त्यांनी तिथे जे एमओयू केले होते, त्याची सध्या परिस्थिती काय? किती लोकांना त्यातून रोजगार मिळाला आहे. आता या वर्षीच्या दावोस दौऱ्यामध्ये जे काही तुम्ही एमओयू केले आहेत. त्या सगळ्यांची यादी करून श्वेतपत्रिकेप्रमाणे दाखवा. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार खरं बोलत आहे की, आपली फसवणूक करतो आहे, हे समजेल, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीवर राज्य सरकार एमओयूची श्वेतपत्रिका काढणार का? हे पाहणे महत्ताचे ठरणार आहे.
दावोसमध्ये एकूण 61 सामजंस्य करार
दरम्यान, दावोस दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार इतकी रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दावोसमध्ये गुंतवणुकीचे 54 आणि राज्यात धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामजंस्य करार केल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
हेही वाचा – Walmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात