फडणवीस देवमाणूस पण पोस्टर्सवरून कमळासह भाजपचे नेते गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना सर्वाधिक कोणी पाठिंबा दिला असेल तर तो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेणे, एखाद्या निवडणुकीत विजय होण्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करणे आणि ठाकरे सरकार कोसळून एकनाथ शिंदेंना आपल्या जवळ करणे, या सर्व गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा एक बॅनर गोंदियामध्ये लावण्यात आला असून यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. तसेच त्यांचा उल्लेख देवमाणूस म्हणून करण्यात आला आहे.

गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी एक बॅनर लावण्यात आला आहे. परंतु या बॅनरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो दिसत आहे. तर पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह कमळाचं चिन्ह सुद्धा गायब झालेलं दिसत आहे. या बॅनरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवमाणूस असा करण्यात आला आहे.

हे बॅनर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक विधान परीषदचे सदस्य परिणय फुके यांनी गोंदिया शहरात जागो-जागी लावले आहेत. महाराष्ट्र सरकार स्थापन करण्यात फडणवीसांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत घोषणा केली आणि ते मंत्रिमंडळाबाहेरून सरकारला पाठिंबा देणार होते. मात्र, पक्ष्यादेश आल्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि भाजप-शिंदे गटाची युती झाल्यानंतर फंडणवीसांचं ते स्वप्न पूर्ण होईल, असं अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र यावेळी ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली नाही. त्यामुळे आता बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.


हेही वाचा : शिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, गडकरींकडून मुख्यमंत्र्यांवर मिश्कील टीका