घरताज्या घडामोडीअजित पवार हे आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक - देवेंद्र फडणवीस

अजित पवार हे आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक – देवेंद्र फडणवीस

Subscribe

भाजपचं शिवसेनेशी वाजलेलं भांडण आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत गुपचूप घेतलेली शपथ या सगळ्याचा उलगडा अखेर देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत गुपचूप शपथविधी घेऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे औटघटकेचे सरकार ठरले. केवळ तीनच दिवसांत दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिला होता. अजित पवार यांच्याबद्दल आज नेमकी काय भावना आहे? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, ‘आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे ते नायक आहेत आणि मी सहनायक आहे. कारण अजित पवार आमच्याकडे आले होते.’ एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी मागच्या दीड महिन्यातील सर्व घटनाक्रम आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले.

‘अजित पवार म्हणाले, शरद पवारांना सगळं माहिती आहे’

अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? हे सांगताना फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही औटघटकेचे सरकार स्थापन केले हे खरं आहे. मात्र, तीन पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देऊ शकत नाहीत. मी शरद पवार यांच्याशी भाजपला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केलेली आहे, असे अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळेच राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही गनिमी कावा करत शपथ घेतली आणि सरकार बनवलं’, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, ‘हा प्रयोग फसल्यानंतर आता पुढच्या काळात इतर पक्षांसोबत युती करताना आणखी विचार करुनच निर्णय घेऊ’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अमृता फडणवीस म्हणतात, ‘गेट वेल सून शिवसेना’!

‘अमृता फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यांची किंमत मोजली’

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्विट करुन टीका केली होती. याबाबत देखील फडणवीसांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. माझ्या सांगण्यावरून त्या काहीही करत नाहीत. तसेच थांबतही नाहीत. त्यांनी याआधी देखील सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांची किमंत मोजलेली आहे. त्यांना अतिशय खालच्या भाषेत ट्रोल केलेले आहे. एवढेच काय, तर राजकीय नेतेही त्यांच्याबाबत खालच्या स्तरावर बोललेले आहेत’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -