मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन पाच दिवस झाले तरी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोघांमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. ज्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणता पक्ष, किती जागांवर आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. पण याचबाबत भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. (Devendra Fadnavis important information about Mahayuti seat allocation)
हेही वाचा… Mahayuti : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक
भाजपाकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे 48 पैकी 20 लोकसभा मतदारसंघात भाजपा उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उरलेल्या 28 जागांबाबत कसा निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण याबाबत प्रसार माध्यमांसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील सर्व लोकसभेच्या जागा या निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या सर्व जागावाटपही लवकरच जाहीर करू. तसेच गेल्या अडीच महिन्यांपासून मविआमध्ये जागावाटपाच्याबाबत चर्चा सुरू असून त्यांनी कोणतीच जागा जाहीर केलेली नाही. मात्र, आम्ही पहिल्या बैठकीत 80 टक्के जागा वाटप निश्चित केले असून दुसऱ्या बैठकीत उर्वरित 20 टक्के जागावाटपही सोडवू, अशी माहिती फडणवीसांकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीच्या कार्यक्रमाला आज (ता. 21 मार्च) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
तर महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीत अद्यापही 12 जागांचा तिढा सुटलेला नाही. ज्यामुळे यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांबाबत अद्यापही तिढा कायम आहे. ज्यामुळे याबाबत आता थेट दिल्लीत चर्चा करण्यात येणार आहे. अमित शहा या जागा वाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करून हा तिढा सोडवणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.