मुंबई : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. यानंतर आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) सर्व मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार याचा उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे. (Devendra Fadnavis makes a suggestive statement about who will be the Chief Minister from the Mahayuti)
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, विरोधी पक्षनेता असेल का? कारण मविआच्या जास्त जागा निवडून आलेल्या नाहीत? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कुठल्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जे काही विरोधी पक्षाचे नेते निवडून आलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो वा मोठा असो, ते ज्या योग्य गोष्टी सांगितील, त्याला आम्ही प्रतिसाद देऊ, अशी भूमिका फडणवीस यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : आम्ही आधुनिक अभिमन्यूच, चक्रव्यूह तोडला; फडणवीसांचा निशाणा
विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमवर खापर फोडलं आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला, तर तिथलं ईव्हीएमने जनमताचं कौल दिला असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रात हे लोक धाराशय झाल्यावर लोकशाही संकटात सापडली आहे. ईव्हीएम संकटात आहे. पण मला असं वाटतं की, अशा परिस्थितीमध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे. तसेच खरी कारणं काय आहेत, हे शोधलं पाहिजे.
मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीमध्ये कोणताही वाद नाही
दरम्यान, मागच्या वेळेस भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. पण आता तुमच्या अनेक लोकांचं मत आहे की, भाजपाला यश मिळालं आहे, तर तुमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही. मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना आमचं पार्लियामेंट्री बोर्ड सूचना करते. ते बसून जो निर्णय घेतील, तो निर्णय असेल. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीमध्ये कोणताही वाद आणि विवाद नाहीय, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; ठाकरेंनाही डिवचलं