पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘..म्हणून मी तसं केलं!’

Devendra Fadnavis Ajit pawar taking oath
२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

गेल्या वर्षभरापासून राज्यात एका प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडू शकलेलं नाही. ते म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी त्या दिवशी पहाटे घेतलेल्या शपथविधीमागे नक्की काय राजकीय घडामोडी घडल्या. पण आता खुद्दा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच त्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. हिंदुस्थान समाचारने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आधीच महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू असलेले अंतर्गत मतभेद अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लागणारे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल भावी राजकीय दिशा देणारे ठरू शकतात.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान २०१९च्या २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे उभ्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. या मुद्द्यावरून मोठा गहजब उडाल्यानंतर अजित पवार नेमके एका रात्रीतून महाविकासआघाडीच्या गोटातून भाजपसोबत कसे काय निघून गेले? या बुचकळ्यात आख्खा महाराष्ट्र पडला होता. अखेर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच त्यावर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘२३ नोव्हेंबरला अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता. राजकारणात नैतिकता असणं आवश्यक आहे. पण नैतिकता जोपासण्यासाठी राजकारणात तरी जिवंत असायला हवं. म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत जायचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रक्रियेबाबत अजित पवार नसून थेट शरद पवार यांच्याशीच चर्चा झाली होती. शिवाय सरकार स्थापनेचा प्रस्ताव देखील शरद पवार यांच्याकडूनच आला होता. इतकंच नाही, तर तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं जे पत्र राष्ट्रवादीकडून राज्यपालांना देण्यात आलं होतं, ते देखील मीच लिहिलं होतं’, असा धक्कादायक खुलासा फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे राज्यातलं वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी लागणारे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल भावी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ‘शिवसेनेने विरोधकांची हातमिळवणी केल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं, त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं’, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, फडणवीस बोलत असलेल्या या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे उपस्थित नव्हते. मात्र, या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं. पण शपथविधीचा उल्लेख आल्यानंतर काही वेळातच हे लाईव्ह बंद झालं आणि त्याचा व्हिडिओ डिलीट झाल्याचं सांगितलं जात आहे.