केंद्र सरकारच्या आधी राज्य सरकार काय मदत करणार ते सांगा; फडणवीसांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा नाही, ठाकरेंच्या जुन्या मागण्यांचा व्हिडीओ दाखवत सरकारवर हल्ला

bjp devendra fadanvis slams shiv sena and sanjay raut maha vikas aghadi govt on rajya sabha election 2022

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठावाडा दौऱ्यावर आहेत. उस्मानाबादमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार मदत करेलच पण राज्य सरकार काय मदत करणार ते सांगा, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करत असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार या राज्यात कोणीच नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करु शकतं. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्राची मदत कधी मिळते हे शरद पवारांना माहित आहे. तरी देखील पवार चेंडू केंद्राकडे टोलावतात, असं फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. पण केंद्राआधी राज्य काय मदत करणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे सरकारने ठरवावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये, अशा शब्दात राज्य सरकारवर हल्ला चढवला.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जुन्या मागण्यांचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती. त्याचा व्हिडीओ दाखवत ख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळेल असं दिसत नाही. इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, केवळ घोषणा करुन समाधान होणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी शरद पवार यांच्या कर्ज काढण्याच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राला १ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत ६० हजार कोटींचं कर्ज काढलं आहे. आणखी ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येऊ शकतं, असं फडणवीस म्हणाले. शिवाय. केंद्र सरकार मदत करेलच. राज्याला मदत केंद्राकडून मदत मिळावी यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. केंद्राजवळ मी बोललो काय आणि उद्धव ठाकरे बोलले काय मदत तेवढीच मिळणार आहे. माझ्या बोलण्याने जास्त आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यानं कमी असं होणार नाही. मोदीजींचा तो स्वभाव नाही, असंही फडणवीस म्हणाले.