अमृता माझं ऐकतीलच असं नाही – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या टिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis reaction on amruta fadnavis tweet
अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्विटवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर अमृता फडणवीस राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या. एवढेच नाही तर शिवसेनेकडून सुद्धा ट्विटरच्याच माध्यमातून अमृता फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या टिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्विट

दरम्यान राहुल गांधी यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘गांधी आडनाव असल्याने कोणी गांधी होत नाही’ असे ट्विट केले होते. त्यानंतर आठ दिवसांनी अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट रिट्विट करत ठाकरे कुटुंबियांवर टीका केली. अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘खरंय देवेंद्रजी, फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं.’ त्यानंतर अमृता फडणवीस यांना शिवसैनिकांनी ट्विटरवरच जशाच तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अमृता यांच्या ट्विटवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दरम्यान अमृता यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांनी काय करावं आणि करू नये हे मी त्यांना सांगत नाही. आणि सांगूनही त्या ऐकतीलच असं नाही,” असं उत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा – NRC वरुन सरकार गोंधळ निर्माण करतय – पवार