मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. त्यांनी तिथे खोदकाम कशासाठी सुरू केले, हेही सांगितले पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात मी वर्षा बंगल्यात जाईल मात्र तिथे झोपणार नाही. मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी नेमकी कशाची भिती आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर आज संपूर्ण दिवस वर्षा निवासस्थानावरून राजकारण रंगताना दिसले. रामदास कदम आणि नितेश राणे यांना लिंबू मिर्चीवाले म्हणत राऊत यांच्यावर टीका केली. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis reaction to the politics going on over Varsha Bungalow)
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. काय वेड्यांचा बाजार सुरू आहे? वर्षा ही काय कोणाच्या खासगी मालमत्ता आहे का? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर मला त्या ठिकाणी जायचे आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरू होती. तसेच माझी मुलगी दहावीत असून तिची 17 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे तिनेच म्हटले की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे राहायला जाऊ. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या राहायला गेलो नाही. पण मुलीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार आहे. मात्र, यावर सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटतं की, माझ्यासारख्या माणसाने यावर उत्तरही देऊ नये, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा – Damania VS Munde : धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील वाद आता न्यायालयात
संजय राऊत यांनी काय दावा केला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानाच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचे शिंग पूरले आहे. त्यांनी रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा निवासस्थानात पूरलेली असल्याची माहिती तिथल्या स्टाफकडून कळाली आहे. मुख्ममंत्री टिकू नये यासाठी हे केले असल्याची माहिती आहे. वर्षाच्या बाहेरच्या लॉनवर खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत. आम्ही तर अंधश्रद्धा मानत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आम्ही लोक आहोत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवास्थानावर जाण्याला का घाबरत आहेत, हे त्यांनी सांगावे? असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते.
हेही वाचा – Eknath Shinde : ‘वर्षा’वर मंतरलेल्या रेड्यांची शिंगे पुरली? एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मला वाटते…’