नागपूर : याठिकाणी आज जिव्हाळा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी चर्चेदरम्यान फडणवीस यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या गुलदस्त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची असल्याचे म्हटले. (Devendra Fadnavis reaction to Uddhav Thackeray visit to Nagpur during the winter session)
विवेक घळसासी यांनी प्रश्न विचारला की, नागपुरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला एक गुलदस्ता दिला. त्यात दिलं होतं की, वील होतं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये नेहमी एक राजकीय संस्कृती राहिली आहे. पण जर आपण दक्षिणेच्या राज्यामध्ये पाहिले तर तिथे राजकीय वैर आहे. तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाहीत. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. पण दुर्दैवाने 2019 ते 2024 च्या कालावधीमध्ये त्याप्रकराची थोडीफार परिस्थिती निर्माण झाली होती, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Devendra Fadnavis : शरद पवार चाणाक्ष आहेत; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्याच माझ्या भाषणामध्ये घोषणा केली होती की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मला परत आणायची आहे. मला बदल घडवण्याचं राजकारण करायचं आहे, बदल्याचं राजकारण करायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, या गोष्टीला सर्वच नेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. नेत्यांना देखील वाटलं की, जी काही भींत आहे ती आपण तोडली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व पक्षाचे नेते एकमेकांना भेट आहेत. जाहीरपणे भेटताना कोणाला आडेवेडे घेत नाही, ही चांगली गोष्ट आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
ठाकरे-फडणवीसांमध्ये जवळीक वाढतेय?
दरम्यान, राजकारणात एक तर तुम्ही रहाल किंवा मी राहीन, असे थेट आव्हान देणारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपा आणि ठाकरे यांच्यामधील संबंध टोकाले गेले होते. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे गुलदस्ता देऊन कौतुक केले होते. त्यामुळे सर्वत्र या भेटीचीच चर्चा सुरू होती. एवढेच नाहीतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून आणि खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केले होते. यानंतर आता ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे यांनी 9 जानेवारी रोजी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जवळीक वाढतेय का? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा – CM Fadnavis : एकनाथ शिंदे कसे झाले तयार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला तो किस्सा