नाशिक : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर विरोधकांच्या या मागणीला फडणवीसांकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर राज्याला लाभलेले गृहमंत्री हे मनोरुग्ण असल्याची जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक येथील कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना Get Well Soon उद्धवजी, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. (Devendra Fadnavis replied to Uddhav Thackeray by saying Get Well Soon)
हेही वाचा… Uddhav Thackeray : “महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण…”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत. या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. पण त्या घटना गंभीर आहेत. त्याची गंभीरता कोणीही नाकारत नाही. परंतु, व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या त्या घटना असल्याने याचा कायदा-सुव्यस्था किंवा राज्यातील परिस्थितीशी संबंध जोडणे चुकीचे आहे. काही दोन-तीन घटना आहेत, त्याच्या पाठीमागे वैयक्तिक कारणे आहेत. त्यांचे एकमेकांशी वैयक्तिक हेवेदावे आहेत. त्यांचे काही भांडण आहेत, त्यांचे काही व्यवहार आहेत. ज्यामुळे त्याही बाबतीत शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
तर, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांना तसही काही माहीत नसते. ते नेहमीच खळबळजनक गोष्टी बोलत असतात. कोणत्याही गोष्टीची चौकशी ही योग्य प्रकारे होईलच आणि याचीही चौकशी होईल. पण अलिकडच्या काळात जे गोपीचंद जासूस तयार झाले आहेत, त्यांनी जरा विचारपूर्वक बोलले पाहिजे, असा सल्लाही फडणवीसांकडून देण्यात आला. तर छगन भुजबळ यांना संरक्षण देण्यात आले आहे. मध्यतंरीच्या काळात त्यांना ज्या धमक्या आल्या. त्यांच्या संरक्षणाबाबतचा तपशील घेण्यात येत आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 10 फेब्रुवारी) अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा तर मला असे वाटते की, उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द ऐकून तरी माझे ठाम मत झाले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे “Get Well Soon” इतकीच मी ईश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. यापुढे मी त्यांच्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.