Homeदेश-विदेशDevendra Fadnavis : दावोस दौऱ्यावरून विरोधकांची टीका; मुख्यमंत्री म्हणाले, मूळात ही असूया

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यावरून विरोधकांची टीका; मुख्यमंत्री म्हणाले, मूळात ही असूया

Subscribe

दावोस दौऱ्यामध्ये करार झालेल्या अनेक कंपन्या भारतीय असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन दिवसीय दौरा पार पडला. या तीन दिवसात राज्यामध्ये 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली असल्याचे जाहीर करण्यात आले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. मात्र तरीही विरोध मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करताना दिसत आहेत. मात्र करार झालेल्या अनेक कंपन्या भारतीय असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. (Devendra Fadnavis response to the opposition criticism of his Davos visit)

दावोस येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार इतकी रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दावोसमध्ये गुंतवणुकीचे 54 आणि राज्यात धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामजंस्य करार केल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑइल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचा रेकॉर्ड, फडवीसांकडून एकूण गुंतवणुकीची माहिती 

विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला 15 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना आनंद होत नसेल तर त्याचा काही इलाज नाही. पण आपण जे काही करत आहोत, ते महाराष्ट्रासाठी करत आहोत. ज्यांनी वेगवेगळे ट्वीट केले आहेत, त्यांना फार उत्तर द्यायची गरज नाही. कारण इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे, त्याचा आनंद आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

आपण ग्लोबलाइज जगात 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना केवळ नकारात्मक दृष्टीने याकडे पाहायचे आहे, ते अशी टीका करतील. मूळात ही असूया आहे. त्यांना त्यांच्या काळात जे जमले नाही, ते आम्ही करून दाखवत आहोत. आपण ग्लोबलाइज जगात आहोत. आपली जेएसडब्ल्यू सारखी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय असली तरी ती जागतिक स्तरावर काम करत आहे. एमजीसारखी कंपनी त्यांनी घेतली आहे. टाटा ही देखील ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे अशा कंपन्या त्यांच्या ग्लोबल पार्टनरसह आपल्याशी एमओयू करतात. महाविकास आघाडी काळात 50 हजार कोटींचे करार झाले आहेत. महाराष्ट्रात एवढी मोठी गुंतवणूक येते, याचा राज्यातील जनतेला आनंद आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो, शिंदेंची ठाकरेंवर टीका