सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये शनिवारी पुण्यात भेट झाली आहे. या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अजित पवारांनी पक्षासोबत बंड केल्यानंतर चार वेळा काका-पुतणे एकमेकांच्यासमोर आले. पण शनिवारी पुण्यात एका उद्योगपतीच्या बंगल्यावर काका-पुतण्याची गुप्त बैठक झाली. या बैठकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला या भेटीबद्दल काही माहिती नाही. या भेटीसंदर्भातील काही तपशील माझ्याकडे नाही. भेटी झाली नाही, किती वेळ झाली. यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानात काही भर टाकून शकत नाही.”
हेही वाचा – ‘पहाटेच्या शपथविधीप्रमाणे अजित पवार परत फिरणार’;राऊतांचा गौप्यस्फोट
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरील चर्चेसंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “आम्ही एक समन्वय समिती तयार केलेली आहे. ती समिती सर्वे फॉर्मुला ठरवेल. कोणते महामंडळ कोणाला द्याचे ठरवेल. अजून कोणत्या गोष्टी नक्की झाल्या नाहीत.”
चांदणी चौक पूल लोकार्पणासाठी शनिवारी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्यात होते. त्यासोबतच वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, मंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील पुण्यात होते. यामुळे पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे होती. ती अखेर खरी ठरली. एका बड्या उद्योगपतीच्या घरी पवार काका-पुतण्यांची गुप्त बैठक झाली.