महाराष्ट्रातील, देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाला साकडं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी या शुभमुहूर्तावर आमचा देश आणि राज्य प्रगतीपथावर जावो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील आणि देशासमोर येणारे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, असं साकडं देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाला घातलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत. सर्वांना सुख समाधानाचं आणि आरोग्य ऐश्वर्य मिळावं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि राज्य प्रगती पथावर जावं ही श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर महाराष्ट्र आणि मुंबई पूर्णत: सजली आहे. उत्साहाचं वातावरण मला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपले उत्सव, सण आणि पर्व आपण साजरे करू लागले आहोत. मला वाटतं ही देखील ईश्वराची कृपा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा