घरमहाराष्ट्र"विरोधकांचे मगरीचे अश्रू आहेत"; देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं

“विरोधकांचे मगरीचे अश्रू आहेत”; देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण करायचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. याच मुद्द्यावर आज विधानसभेत विरोधकांनी सरकारचा घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक होत वेगवेगळ्या घोषणांनी विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षांनी सभागृहात केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण करायचं आहे. त्यांचे अश्रु हे मगरीचे अश्रु आहेत. हे विरोधक शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. जर हे विरोधक शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर मागच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली असती”, असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

तसंच राज्यात हवालदील झालेल्या शेतकरीवर्गाला फडणवीसांनी दिलासा दिलाय. “विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी राज्याचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहीलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांला सरकार मदत करेल. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत करेल. पंचनामे सुरू आहेत. तसंच मागच्या काळात कोण पाठीशी उभं राहिलं तरी हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवकाळी पावसामुळं राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तात्काळ नुकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -