ऑफिसच्या एसीत बसून नेते झालेल्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर

सत्तेत नसल्याची खंत वाटते परंतु आम्ही विरोधी पक्षात असून भूमिका चोख बजावू

devendra fadnavis slams sanjay raut criticism of marathwada rain affected tour
ऑफिसच्या एसीत बसून नेते झालेल्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर

शिवसेनान नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामना अग्रलेखातून टीका केली होती. राऊतांच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत हे ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राऊतांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी पाहणी दौरा करताना राजकारण केलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीस उस्मानाबाद, लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करतील. लातूरमध्ये फडणवीस यांनी माध्यमांशी संवास साधला आहे. यावेळी फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कार्यालयात बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहिती. हे ऑफिसमधील एसीत बसलेले मोठे लीडर, त्यांना काय उत्तर द्यायाचे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

मराठवाडा-विदर्भ विरोधी सरकार

राज्य सरकार हे विदर्भ- मराठवाडा विरोधी सरकार आहे. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं आहे. परंतु सरकारमधील एकाही मंत्र्याने पाहणी दौरा केला नाही. पालकमंत्र्यांनी सुद्धा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला असे म्हणत हे सरकार मराठवाडा आणि विदर्भ विरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही केंद्राच्या निकषाबाहेर जाऊन मदत केली होती. त्यामुळे र्जाय सरकारनंही आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकषांबाहेर जाऊन मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

सत्तेत नसल्याची खंत पण…

राज्यात सतत येणाऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या मदतसीसाठी राज्यात सत्तेत नसल्याची खंत वाटते का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. सत्तेत नसल्याची खंत वाटते परंतु आम्ही विरोधी पक्षात असून भूमिका चोख बजावू असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान मोदींची भूमिका आहे का?; राऊतांचा सवाल