घरताज्या घडामोडीश्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर

श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर

Subscribe

मेट्रो कारशेडचा प्रश्न विरोधकांनी सोडवा, मी तुम्हाला त्याचे श्रेयही द्यायला तयार आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नसल्याचे उत्तर दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेडवर भाष्य केले. मेट्रो कारशेडचा प्रश्न केंद्राने आणि राज्याने एकत्रित बसून वाद सोडवणे आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचे श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे, असे म्हणत श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

“प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा,” असे फडणवीस म्हणाले. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. “३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णत: वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायची असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे.केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, यापुढे सुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरेच्या जागेला मा. सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि १०० कोटी रुपयांचा खर्चही झाला.
लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो. मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की,आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -