मुंबई – विरोधक सध्या निराशेतून जात आहेत, आम्ही मात्र महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्या गोष्टीवर फोकस करावे हे, विरोधकांच्या लक्षात येत नाही. त्यांनी दिलेल्या पत्रकामधून अंतिम आठवडा प्रस्ताव दिसत आहे. सरकारकडून विकासाची कामं वेगाने सुरु आहे. राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलेला शब्द, मराठा समाजाला आरक्षण देऊन पूर्ण केला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कालपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार जे बोलत होते, तिच स्क्रिप्ट आज जरांगेंनी का मांडावी? हा प्रश्न आहे. जरांगेंच्या आरोपांवर थेट उत्तर देण्याचे मात्र फडणवीसांनी टाळले.
सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचे आयोजन करण्यात आले. त्यावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. चहापानानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षाने दिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मला विरोधकांनी पत्रकार परिषद घेतल्याचे दिसले नाही. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले. अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा असावा असे ते पत्र आहे. त्यांचा नेमका फोकस कशावर आहे तेच लक्षात आले नाही. विरोधक हे गोंधळल्यासारखे दिसत असल्याची टीका फडणवीसांनी केली.
🕖 7.05pm | 25-2-2024 📍 Mumbai.
LIVE | Press conference on the eve of Budget Session of Maharashtra Legislature 2024.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद.@mieknathshinde @AjitPawarSpeaks#BudgetSession #Maharashtra #Mumbai https://t.co/krFYPznolE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 25, 2024
उद्धव ठाकरे, पवारांची स्क्रिप्ट जरांगेंनी का मांडावी?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा, विष देण्याचा, एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले, राज्य सरकार विकासाच्या दिशेने निघाले आहे. राज्यात गुंतवणूक येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द महाराष्ट्राला दिला होता, त्याची वचनपूर्ती आमच्या सरकारने केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे.
मनोज जरांगे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट का मांडावी असा प्रश्न पडला आहे. असे म्हणत फडणवीसांनी जरांगेंच्या आरोपावर बोलणे टाळले. जरांगेंना सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न झाला का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला तरी हे पटते का? या आरोपांवर तुम्हाला काय वाटते? असा उलट सवाल फडणवीसांनी पत्रकारांना केला.
मनोज जरांगे यांच्या मागण्या एकानंतर एक वाढत चालल्या आहेत. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता त्यांनी संयम ठेवला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा खपवून घेतली जाणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : Manoj Jarange : “काहीही बोलले तर खपवून घेणार नाही”, अजित पवारांचा मनोज जरांगेंना इशारा