आमचे मिशन महाराष्ट्र आणि बारामतीच.., देवेंद्र फडणवीसांचे संकेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी गाठीभेटी देऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिशन बारामतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचे मिशन महाराष्ट्र, मिशन इंडिया सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते त्याच्यामुळे बारामती हे काही वेगळे नाही, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

पुण्यातील आजचा दौरा राजकीय हेतूचा नाही. उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी मी पुरंदर येथे आलो आहे. रामोशी समाजाचे मोठे योगदान असून हा समाज मागे राहून गेला आहे. त्यामुळे नवीन सरकार त्याचा प्रश्न सोडवेल. रामोशी समाजाशी संवाद साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे का, याबाबत मला माहिती नाही. याबाबत कोर्टात केसची सुनावणी सुरू आहे. त्यावर बोलणं योग्य नाही. कोर्टाबद्दल बोलताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र बसून ठरवू, आमचा फक्त मुंबई पॅटर्न आहे, असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : निर्णय चुकीच्या पद्धतीने लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि..,भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत