घरमहाराष्ट्र...आणि फडणवीस संतापले; तत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाईचे दिले आदेश

…आणि फडणवीस संतापले; तत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाईचे दिले आदेश

Subscribe

 

मुंबईः शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून अमरावतीच्या शेतकऱ्याला कर्ज नाकारल्याचा प्रकार समोर येताच संतापून फडणवीस यांनी हे फर्मान जारी केले.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने खास खरीप हंगामपूर्व बैठक बुधवारी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या बैठकीला सहकारमंत्री अतुल सावे, मत्स्य व्यवसाय मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते.

या बैठकीत अमरावतीच्या शेतकऱ्याला कर्ज नाकारल्याचा मुद्दा समोर आला. त्यावर संतप्त झालेल्या फडणवीस यांनी बॅंकांची चांगलीच कानउघडणी केली. शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यासाठी बॅंकांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. सिबिल स्कोअर तपासला जातो. बॅंक खात्याचा तपशील मागितला जातो. कर्जाची परतफेड कशी होणार यासाठी अनेक प्रश्न विचारले जातात. परिणामी शेतकरी निराश होतो. ही सर्व उठाठेव करण्यापेक्षा बॅंकांनी शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना नाहक त्रास देतील, कर्ज देणार नाहीत. अशा बॅंकांवर कारवाईचा बडगाच उगारायला हवा. सिबिलचे कारण देत ज्या बॅंका शेतकऱ्यांना कर्ज नाकारतील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,  येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो यशस्वीपणे गेला पाहिजे यासाठी योग्य अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बियाणे, खत, किटकनाशक सर्व गोष्टींचा समावेश आहे. सध्याच्या हंगामात बिया आणि खते मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे कुठेही तुटवडा भासू दिला जाणार नाही. त्याचबरोबर यामध्ये गुणवत्ता सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर बोगस बियाणे, बोगस खत मार्केटमध्ये आणण्याचे कृत्य करणाऱ्यांवर आणि बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -