देवेंद्र फडणवीस बनणार उपमुख्यमंत्री, भाजपा नेतृत्वाची सूचना

Devendra Fadnavis

तासाभरापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. तसे ट्विटही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. त्यानुसार फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावरून भाजपातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. तसेच त्यांनी त्यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु भाजपच्या बड्या नेत्यांनी सूचना केल्यानंतर फडणवीस आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांची मनधरणी केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपमधील वाद उफाळल्याची देखील चर्चा आहे. कारण राजभवनात अगोदर दोनच खूर्च्या होत्या. मात्र, यामध्ये आता तिसरी खुर्ची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे चित्र स्पष्ट झालं आहे.


हेही वाचा : एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या शुभेच्छा