घर ताज्या घडामोडी VIDEO : छत्रपती शिवाजी महारांजाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारणार, देवेंद्र फडणवीसांचे शिवराज्याभिषेक...

VIDEO : छत्रपती शिवाजी महारांजाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारणार, देवेंद्र फडणवीसांचे शिवराज्याभिषेक सोहळ्यात आश्वासन

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या न्याय आणि शासन पद्धतीनुसार आम्हाला काम करता यावे यासाठी आम्ही आजच्या या महान दिवशी प्रार्थना करत आहोत. शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, यासाठी पंतप्रधान मोदींना भेटून विनंती केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या न्याय आणि शासन पद्धतीनुसार आम्हाला काम करता यावे यासाठी आम्ही आजच्या या महान दिवशी प्रार्थना करत आहोत. शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, यासाठी पंतप्रधान मोदींना भेटून विनंती केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत म्हटले, “छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झाले पाहिजे, ही उदयनराजेंची भावना पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी करणार आहे. आपल्या भावना पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवून शिवाजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक दिल्लीत केले जाईल.” असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

इतिहासात न्याय प्रिय राजे म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या शिवसेना-भाजपचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानेच सुरु असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. “महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात खऱ्या अर्थाने छत्रपतींनी स्वराज्याच्या निर्मितीतून केली. आणि याठिकाणी केवळ स्वराज्य नाही तर अखिल भारताला नव्हे तर अखिल जगाला दाखवून दिलं जाणते राजे म्हणजे काय असतात. राज्य कारभार कसा चालविला पाहिजे. सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे म्हणून जगाच्या इतिहासात न्याय प्रिय राजे म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव नोंदवले गेले आहे.” असा शिवरायांच्या कार्याचा गौरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

छत्रपतींचे किल्ले स्थापत्यशास्त्राचे नमुने

“छत्रपतींचे किल्ले स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. छत्रपतींनी दिलेले जलसंधारणाचे धडे आजही आम्हाला दुष्काळमुक्तीसाठी कामी येत आहेत. छत्रपतींनी वनसंवर्धनाचे दिलेले धडे आणि त्यावेळेस काढलेले आदेश हे आजही आम्हाला शिरसावंद्य आहेत, आणि त्याच आदेशानुसार जर आम्ही काम केलं तर आम्ही आमची पृथ्वी आणि आमचं पर्यावरण वाचवू शकतो.”

- Advertisement -

“छत्रपतींनी ज्या प्रकारची कायद्याची, न्यायाची व्यवस्था आणि महिलांना संरक्षण दिलं, त्याच मार्गाने चालून आम्ही स्वराज्याला सुराज्य करु शकतो,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि तेव्हापासून स्वतःची कालगणना सुरु केली. छत्रपतींनी हिंदू लेखन पद्धती सुरु केली. परकियांच्या तावडीतून सोडवलेल्या गड किल्ल्यांना नवीन नावे देण्यात आली. सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट, ही छत्रपतींची शासन व्यवस्था आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.”

शिवरायांनी सुरु केले शक आणि कालगणना

या राज्याभिषेकाचे महत्त्व काय आहे, ते सांगतानां फडणवीस म्हणाले, “या राज्याभिषेकाने नवीन कॅलेंडर सुरु झालं. स्वतःची कालगणना सुरु झाली. या राज्याभिषेकामुळे नवीन चलन चलनात आलं. चांदीची आणि तांब्याची नाणी चलनात वापरली जाऊ लागली. पूर्वीची लेखन पद्धती बंद करुन छत्रपतींनी हिंदू लेखन पद्धती सुरु केली. परकीयांच्या तावडीतून सोडवलेल्या गड-किल्ल्यांना पूर्वीची नावं आणि अस्तित्व महाराजांनी दिलं. त्यासोबत राज्य आणि व्यवहार कोष मराठीत चालेल पाहिजे यासाठी महाराजांनी ग्रंथ निर्माण करुन घेतले. भाषा शुद्धीकरणासाठीचे प्रयत्न महाराजांनी केले, तेच प्रयत्न पुढे संभाजी महाराजांनी देखील सुरु ठेवले.” असे सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले, “परकियांविरुद्ध सातत्याने मोहिमा उघडून आम्हाला परकीय आक्रत्यांकडून मुक्ती देण्याचे काम खऱ्या अर्थाने छत्रपतींनी केले. सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट, हेच शास्त्र छत्रपतींनी आम्हाला शिकवलं.”

राजमुद्रा नौदलावर

छत्रपती शिवाजी महारांजाची राजमुद्रा आता भारतीय नौदलाची राजमुद्रा करण्यात आल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं. ते म्हमाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेव्हीची इंग्रजांची राजमुद्रा काढून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा स्थापित केली आहे.”

महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत करण्याची मागणी

छत्रपती उदयन महाराजांनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उदयन महाराजांनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे. उदयनराजेंनी व्यक्त केलेली भावना मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचवू. नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही मागणी पूर्ण करु.” असेही आश्वासन फडणवीसांनी यानिमित्ताने दिले आहे.

“मागच्या काळात काही ग्रंथ आपण तयार केले आहेत. मात्र तरीही आपण (उदयनराजे भोसले) मागणी केली आहे की महाराजांचा इतिहास ग्रंथ रुपात आला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेतील”, असेही फडणवीस म्हणाले.

रायगडाच्या संवर्धनाकरता एक समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीत छत्रपती संभाजी राजे यांना प्रमुख स्थान देण्यात आले होते. या समितीच्या माध्यमातून बरचशी कामे झाली आहेत, मात्र भारतीय पुरातत्व खात्याची (एएसआय) बरीच बंधने असल्यामुळे कामं धिम्या गतीने होत आहेत, याची कबुली देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावून त्याला एएसआयच्या अधिकाऱ्यांना बोलावू, केंद्रीय मंत्र्यांना बोलावून ही कामे वेगाने व्हावीत यासाठी प्रयत्न करु,” असे आश्वासन दिले. त्यासोबतच उपमुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंनी केलेली प्रतापगड प्राधिकरणाची केलेली मागणी मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात सहा शिवचरित्र उद्यान

३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यातील सहाही महसुली विभागांच्या मुख्यालयांच्या शहरात प्रत्येकी ५० कोटी रुपये खर्चून शिवचरित्राची माहिती देणारी उद्याने उभारणार असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती ही विभागीय मुख्यालयाची शहरं आहेत.

भरत गोगावले यांनी शिवसृष्टीची केलेली मागणीही पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा केली. त्यासोबतच आणखीही निधी लागला तर तो कमी पडू दिला जाणार नाही, असाहे आश्वासन शिंदेनी दिले.

 

- Advertisment -